चंद्रपूरचा पाणीपुरवठा ठप्प होणार? करापोटी महानगरपालिकेकडे थकले इतके कोटी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या मालकीचे इरई धरण आहे. या इरई धरणाच्या प्रकल्पात अहवालात चंद्रपूर शहराला वर्षभरात 12 दलघम पाणी देण्याचे ठरले आहे. मात्र अहवालात आणखी एक तरतूद होती. ती अद्याप मनपाने पूर्ण केली नाही. इरई धरण वीज केंद्राच्या मालकीचे असेल तरी पाण्यावरील हक्क मात्र पाटबंधारे विभागाचा आहे. या पाण्यावर कर आकारण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागासोबत मनपाने करार करणे आवश्‍यक आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर शहराची तहान भागविणाऱ्या इरई धरणातील तब्बल सहा कोटींचा पाणीकर महानगर पालिकेने थकविला आहे. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने 31 मार्चपर्यंत थकीत पाणी जमा केला नाहीतर शहराचा पाणी पुरवठा ठप्प करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभाग दुप्पट कर आकारत असल्याचा आरोप करीत आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही विभागाच्या वादात शहरात ठणठणाट निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा - नागपूर हादरले; भिंतींना तडे, सगळीकडे खळबळ

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या मालकीचे इरई धरण आहे. या इरई धरणाच्या प्रकल्पात अहवालात चंद्रपूर शहराला वर्षभरात 12 दलघम पाणी देण्याचे ठरले आहे. मात्र अहवालात आणखी एक तरतूद होती. ती अद्याप मनपाने पूर्ण केली नाही. इरई धरण वीज केंद्राच्या मालकीचे असेल तरी पाण्यावरील हक्क मात्र पाटबंधारे विभागाचा आहे. या पाण्यावर कर आकारण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागासोबत मनपाने करार करणे आवश्‍यक आहे. मात्र मागील तीस -पस्तीस वर्षात असा कोणताही करणार केला नाही. करार नसल्यामुळे पाटबंधारे विभाग मनपावर दुप्पट पाणी कर आकारत आहे. परिणामी सहा कोटींच्यावर मनपावर पाणीकर थकीत आहे. यापूर्वी पाटबंधारे विभागाने शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस बजावली होती. तेव्हा 66 लाख रुपये अदा करण्यात आले. त्यानंतर एक छद्दामही दिला नाही.

मनपा-पाटबंधारेच्या वादात शहरात ठणठणाट

12 दलघमी पाणी उचलण्याची परवानगी आहे. मात्र शहराला एवढे पाणी लागत नाही. न उचललेल्या पाण्याचा कर द्यायचा कसा असा प्रश्‍न मनपा प्रश्‍न विचारत आहे. यावर पाटबंधारे विभाग मनपाने अद्याप मीटर का लावले नाही? असा सवाल करीत आहे. मीटर नसल्यामुळे मनपा किती पाणी उचलते याचे मोजमाप कसे करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मीटर लागेपर्यंत 12 दलघमीचे पाण्यावरच र दुप्पट पाणी आकारला जाईल. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शाम काळे यांनी यापूर्वीच मनपा आयुक्त संजय काकडे यांची भेट घेतली होती. करारनामा आणि मीटर लावण्यासंदर्भात त्यांच्या चर्चा झाली. आठ दिवसात या दोन्ही गोष्टी मार्गी लावण्याचे ठरले. मात्र अद्याप त्या पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे थकीत पाणी करावर व्याजही आकारले जात आहे, असे काळे यांनी सांगितले.

 

पेपर मिललाही इशारा

बल्लारपूर पेपर मिलने अलीकडेच करार नामा केला आहे. मात्र त्यांच्याकडे यापूर्वी तब्बल 58 कोटी रुपयांचा पाणी कर थकीत आहे. यासंदर्भात न्यायालयात प्रकरण प्रविष्ट आहे. मात्र आता पेपर मिलचेही पाणी तोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यांनीही 31 मार्चपर्यंत थकीत कर भरण्याची मुदत दिली जाणार आहे.

चंद्रपूर महानगर पालिका आणि बल्लारपूर पेपर मिलने 31 मार्चपर्यंत थकीत पाणी कर भरावा. अन्यथा चंद्रपूर शहराचा आणि पेपर मिलचा पाणी पुरवठा ठप्प करावा लागेल. त्यासंदर्भात दोघांनाही लवकरच नोटीस देवू. ""
- शाम काळे, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभाग

""करार करण्याची जबाबदारी आमचीच नाही. ती पाटबंधारे विभागाचाही आहे. दुप्पटीने पाणी कर आकारणे चुकीचे आहे. ""
- महेश बारई, शहर अभियंता, मनपा ,चंद्रपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Chandrapur's water supply be stalled? So many crores tired of the municipal corporation ...