ही दारूबंदीची समीक्षा की दारूची मार्केटिंग : डॉ. अभय बंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 24 लाख लोकसंख्येपैकी 11 टक्के लोकांनी "दारूबंदी नको' असल्याचे निवेदन दिल्याचे उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहे. गावातील एक दारू दुकान बंद करायला गावातील एकूण वयस्क किंवा महिलांपैकी किमान 50 टक्‍क्‍यांनी उपस्थित राहून दारू दुकानाविरुद्ध मत नोंदविल्यास सुरू असलेले दुकान बंद होते.

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समीक्षा समिती गठित केली आहे. पण, समीक्षा करण्याऐवजी चंद्रपूरच्या उत्पादन-शुल्क विभागाने मंगळवारी (ता. 25) दूरदर्शन वाहिनीसमोर दारूबंदी नको असलेल्यांचा दोन लाख 62 हजारांचा आकडा जाहीर केला आहे. समीक्षा म्हणजे मूल्यमापन. पण, या समितीने दारूबंदीचे मूल्यमापन अजून केलेच नसताना उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीच्या मतमोजणीपेक्षाही अधिक गतीने, दोन तासांत हा आकडा कसा काय जाहीर केला? त्यामुळे ही दारूबंदीची समीक्षा की दारूच्या संभाव्य ग्राहकांची मोजणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे मत डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. 

राज्य शासनाने व मंत्रिमंडळाने 2015 मध्ये घेतलेल्या दारूबंदीच्या निर्णयाविरुद्ध पालकमंत्री किंवा जिल्हा प्रशासनाने अशी निवेदने बोलावणे व त्यांची मतगणना करणेच अवैध आहे. अशारीतीने शासकीय निर्णयांची फेरतपासणी करायची असल्यास मग जीएसटी हवा की नको, गुटखा-खर्रा बंदी हवी की नको, वीज फुकट द्यावी का, आरक्षण हवे की नको, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा निर्णय त्यांच्या बाजूने व विरोधी निवेदन मोजणी करून करावा का? चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 24 लाख लोकसंख्येपैकी 11 टक्के लोकांनी "दारूबंदी नको' असल्याचे निवेदन दिल्याचे उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहे. गावातील एक दारू दुकान बंद करायला गावातील एकूण वयस्क किंवा महिलांपैकी किमान 50 टक्‍क्‍यांनी उपस्थित राहून दारू दुकानाविरुद्ध मत नोंदविल्यास सुरू असलेले दुकान बंद होते. मग याच न्यायाने सुरू असलेली दारूबंदी रद्द करायला किमान 12 लाख लोकांचे मत किंवा किमान 8 लाख वयस्कांचे मत हवे. या शासकीय निकषावरच ही "मतमोजणी' पराभूत होते. 

अवश्य वाचा-  का रात्री भाऊ आला दारू पिऊन, मग बहिणीने केले हे...

दारूबंदी ठेवावी की उठवावी यावर 15 दिवसांत निवेदने द्या, असे जाहीर करण्यात आले. ई-मेलने किंवा प्रत्यक्ष चंद्रपूरला येऊन निवेदन देण्यासाठी आवश्‍यक माहिती, क्षमता व वेळ जिल्ह्याच्या गावागावांत राहणाऱ्यांपैकी किती लोकांकडे आहे? विशेषतः जिल्ह्यातील स्त्रियांच्या मागणीमुळे ही दारूबंदी लागू झाली, त्या 8 लाख स्त्रियांपैकी कितींनी निवेदन दिले, असा मुद्दाही डॉ. बंग यांनी उपस्थित केला आहे. 
जागतिक तज्ज्ञांनी भारतातील दारूबंदीचा परिणाम मोजला असता (अमेरिकन ईकोनिमिस्ट रिव्यू) दारूबंदीमुळे पुरुषांचे दारू पिणे 40 टक्के कमी झाले. स्त्रियांवरील अत्याचार व गुन्हे 50 टक्के कमी झाले असे आढळले. म्हणजे दर हजार लोकसंख्येमागे स्त्रियांच्यावरील 40 अत्याचार कमी झाले. "दारूबंदी उठवा' याचा अर्थ चंद्रपूरचे 80 हजार नवे पुरूष दारू प्यायला लागतील. स्त्रियांवरील अत्याचार दुप्पट होतील व स्त्रियांविरुद्ध एक लाख वाढीव गुन्हे व अत्याचार होतील, असेही डॉ. बंग म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is this wine ban Review or Marketing of wine: Dr. Abhay Bang