अबब! तीस दिवसातच राज्यातील 95 लाचखोर अडकले जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकिय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये पोलिस विभाग आघाडीवर असून, नवीन वर्षातील एकाच महिन्यांत तब्बल 95 लाचखोर एसीबीच्या जाळयात अडकले आहेत. विशेष म्हणजे अपसंपदेच्या तीन गुन्ह्यात पाच जण अटक करण्यात आले आहेत.

अकोला : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकिय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये पोलिस विभाग आघाडीवर असून, नवीन वर्षातील एकाच महिन्यांत तब्बल 95 लाचखोर एसीबीच्या जाळयात अडकले आहेत. विशेष म्हणजे अपसंपदेच्या तीन गुन्ह्यात पाच जण अटक करण्यात आले आहेत.

शासनाचे विविध विभाग सर्वसामान्यांसाठी कार्यरत आहेत. मात्र याच कार्यालयातील अधिकारी हे सर्वसामान्यांना लुबाडण्यासाठी बसलेले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांचा प्रशासनावरील उडणारा विश्वास कायम रहावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांवर कारवाई करून टाच निर्माण केली आहे. 2020 मधील जानेवारीत राज्यभरात 63 सापळा कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये 95 लाचखोरांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. तेव्हा भ्रष्टाचारच शिष्टाचार बनतोय की काय असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत.

विभागानिहाय लाचखोर अधिकारी
विभाग    सापळा लाचखोर
मुंबई         06      10
ठाणे          08      14
पुणे          20       30
नाशीक     05       06
नागपूर     03       03
अमरावती 07      11
औरंगाबाद 06      08
नांदेड       08      08

पोलिस विभाग लाचखोरीत अव्वल
जानेवारीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक लाचखोर पोलिस विभागात आढळून आले आहेत. 14 लाचखोर पोलिसांना एसीबीने सापळा रचत रंगेहात अटक केली आहे. तर त्यापाठोपाठ महसूल विभाग दुसऱ्यास्थानी असून, 10 लाचखोरांना या विभागातून अटक केली असून, उर्वरीत विभागातील संख्या कमी जरी असली तरी त्या विभागात लाचखोरी येत्या काही दिवसांत वाढणार यात शंका नाही.

25 विभागात नाही सापडले लाचखोर
राज्यातील शासनाच्या 44 विभागापैकी 25 विभागात जानेवारीत एकही लाचखोर न आढळल्याची माहिती आहे. मात्र, 19 विभागातूनच एकूण 95 लाचखोरांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. हे चित्र एकाच महिन्यातील असून, अजून या वर्षातील 11 महिने शिल्लक असल्याने लाचखोरी किती झपाट्याने वाढणार याची ही एकप्रकारे चुणूकच आहे.

अपसंपदेच्या तीन गुन्ह्यात पाच अटकेत
सर्वसामान्यांकडून लाच घेणाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून अटक केली आहे. यासोबतच या विभागाने असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्तीची काळी माया जमविणाऱ्यांनाही आपला इंगा दाखविला आहे. एसीबी पथकाने मुंबई, ठाणे आणि नाशीक विभागात अपसंपदेची प्रत्येकी एक कारवाई करून पाच जणांना आतापर्यंत अटक केल्याची माहिती पुढे येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within thirty days, 95 corrupt ACB traps in the state