esakal | कठोर परिश्रमाशिवाय यश नाहीच : सलीम दुराणी
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

कठोर परिश्रमाशिवाय यश नाहीच : सलीम दुराणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः खेळाप्रती प्रामाणिक राहून मैदानावर कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच अपेक्षित ध्येय गाठून आयुष्यात यशस्वी होता येऊ शकते, असा कानमंत्र माजी कसोटीपटू सलीम दुराणी यांनी बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलच्या 53 व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपुरातील युवा खेळाडूंना दिला.
लक्ष्मीनगरातील बॅंक ऑफ इंडिया स्टाफ सोसायटी सभागृहात रविवारी आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. आपल्या छोटेखानी भाषणात दुराणी म्हणाले, कठोर परिश्रमाचे नेहमीच चांगले फळ मिळते. त्यामुळे खेळाडूंनी यशापयशाची पर्वा न करता मैदानावर घाम गाळावा. खेळात यशस्वी होण्याचा हाच एकमेव "सक्‍सेस मंत्र' आहे. दुराणी यांनी यावेळी नागपुरातील आठवणीही उपस्थितांसोबत "शेअर' केल्या.
दुराणी यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर दुराणी यांचे घनिष्ट मित्र व सौराष्ट्रचे माजी रणजीपटू वामन जानी, बॅंक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विलास पराते, पंजाब नॅशनल बॅंकेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत कुळकर्णी, युनियन बॅंकेचे सुमेध सिंग, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संजय कुळकर्णी, स्टेट बॅंकेचे हेमंत वसू यांच्यासह कौन्सिलचे अध्यक्ष रमेश ठाकूर, सचिव प्रफुल्ल नांदेडकर, शरद पाध्ये, चंद्रशेखर कारकर, रवी जोशी, राजेश जोशी, त्रिभुवन मेश्राम, सी. डी. माणके, रवी गिन्हे, प्रदीप खानोरकर आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतला सर्वोत्कृष्ट क्रीडापटू, तर माजी महापौर व क्रीडा संघटक कुंदा विजयकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. "सकाळ'चे वरिष्ठ बातमीदार नरेंद्र चोरे यांनाही जवाहरलाल नेहरू क्रीडा पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अन्य विजेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरुदास राऊत, बुद्धिबळपटू रौनक साधवानी, क्रिकेटपटू आदित्य सरवटे, मोहित काळे, धावपटू नागराज खुरसणे, प्राजक्ता गोडबोले, आंतरराष्ट्रीय पंच मंगेश मोपकर, नानाभाऊ समर्थ, कॅरमचे पदाधिकारी इक्‍बाल महम्मद, शिक्षक सहकारी बॅंकेचे संजय विंचूरकर, हॅंडबॉलपटू पूनम कडव, बॅंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू बॅंक ऑफ इंडियाचे श्रीकांत पेंडसे, गायक निरंजन बोबडे, प्रभाकर साठे यांच्यासह विविध आंतरबॅंक स्पर्धेतील विजेत्यांचा समावेश आहे. आदित्यच्या वतीने त्याचे आजोबा श्‍याम सरवटे यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार विजेत्यांच्या वतीने कुंदा विजयकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी बॅंकर्सतर्फे दुराणी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ चंद्रा यांनी संचालन केले. नांदडेकर यांनी प्रास्ताविक केले. ठाकूर यांनी आभार मानले.

loading image
go to top