पुजारी पतीच्या मंत्रतंत्राला दूर सारून डॉक्‍टरांनी महिलेची केली सुखरूप प्रसूती...जुळ्यांना दिला जन्म

मनोहर बोरकर
Sunday, 19 July 2020

महिलेचा पती पुजारी असल्याने मंत्रतंत्रादी कार्याचा प्रकार घडून अनर्थ होण्याची शक्‍यता होती. शिवाय दिवस उलटून गेल्याने घरी प्रसूती केली असता तिच्या जिवाला धोका होता. शनिवारी (ता. 18) दुपारी 2 वाजता तिला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान तिची नॉर्मल प्रसूती होऊन जुळ्यांना जन्म दिल्याची गोड बातमी कळली.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : देशातील सर्वांत मागास जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही नागरिकांमध्ये आताही अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होऊनही सरकारची आरोग्यसेवा एका गर्भवती महिलेने नाकारली. त्यानंतर घरी जात मंत्रतंत्राचा इलाज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गर्भवतीचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करून तिची सुखरूप प्रसूती केली. विशेष म्हणजे या महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

तालुक्‍यातील तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तांबडा उपकेंद्रातील तांबडा गावात चनका संजय मट्टामी (वय 36, रा. तांबडा) या गर्भवती महिलेची प्रसूतीची तारीख लोटूनही तिची प्रसूती झाली नाही. त्यामुळे आरोग्यसेविकेने तिची तपासणी केली असता तिच्या दोन्ही पायाला गंभीर सूज दिसून आली. तिचा रक्तदाबसुद्धा वाढला होता. तिला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु तिने जबरदस्तीने सुटी करून घेत घर गाठले.

ही बाब माहीत होताच आरोग्यसेविका कुळमेथे यांनी तिचा पाठपुरावा केला, तर ती शेतात असल्याचे कळले. आरोग्यसेविका कुळमेथे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश नागोसे यांच्याशी शनिवारी (ता. 18) संपर्क केला असता डॉक्‍टरांनी सकाळीच तांबडा गाव गाठले. एक किमीचे अंतर पायी पार करत गर्भवती असलेल्या चनका मट्टामीला शेतात भेटले. शेतातच एका झोपडीत तिचा रक्तदाब, रक्तशर्करा व इतर तपासण्या केल्या. तिला दवाखान्यात भरती होण्यास सांगितले तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला.

पाच तास मनधरणी

तिच्या नवऱ्याचीला भेट घेऊन विचारले असता तो स्वत:च पुजारी आहे, असे सांगून आम्ही घरीच प्रसूती करून म्हणाला. तो पुजारी असल्याने मंत्रतंत्रादी कार्याचा प्रकार घडून अनर्थ होण्याची शक्‍यता होती. शिवाय दिवस उलटून गेल्याने घरी प्रसूती केली असता तिच्या जिवाला धोका होता. तब्बल 5 तास मनधरणी करूनही मट्टामी कुटुंब ऐकत नव्हते. शेवटी पोलिस स्टेशनला तक्रार करण्याचे सांगताच ते दवाखान्यात येण्यास राजी झाले.

हेही वाचा : काय? गडचिरोलीत आॅगस्ट महिन्यात किलबिलाट...पालकमंत्र्यांनी दिले संकेत

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक

शनिवारी (ता. 18) दुपारी 2 वाजता तिला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान तिची नॉर्मल प्रसूती होऊन जुळ्यांना जन्म दिल्याची गोड बातमी कळली. दोन्ही बालके सुदृढ आहेत. तसेच मातेची प्रकृतीही चांगली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman who refused health care finally gave twins birth safely