विलगीकरणातून डिस्चार्ज मिळालेली महिला निघाली पॉझिटिव्ह आणि... 

सायराबानो अहमद 
Sunday, 12 July 2020

धामणगाव शहरात व तळेगाव दशासर येथे पुन्हा रुग्ण आढळल्याने तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 13 झाली आहे. धामणगाव रेल्वे शहर पुन्हा एकदा कोरोनावाढीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. तालुक्‍यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असून, गेल्या आठवड्यात एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

धामणगाव रेल्वे ( अमरावती) : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना धामणगाव रेल्वे तालुक्‍यात सुद्धा उद्रेक सुरूच आहे. अवघ्या काही तासात तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यातच चार दिवसांपूर्वी कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आलेली महिला रविवारी (ता. 12) कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, धामणगाव शहरात व तळेगाव दशासर येथे पुन्हा रुग्ण आढळल्याने तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 13 झाली आहे. धामणगाव रेल्वे शहर पुन्हा एकदा कोरोनावाढीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. तालुक्‍यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असून, गेल्या आठवड्यात एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सदर कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील तीन सदस्यांना प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण कक्षात अमरावती येथे ठेवले होते. 

अधिक वाचा - अबब! बेंबळा धरणात २० किलोची एकच मासोळी...मासेमारी जोमात
 

या तीनपैकी मृताच्या मोठ्या मुलाची चाचणी पॉझिटिव्ह आली तर मृताची पत्नी व लहान मुलाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. सदर अहवाल चार दिवसांपूर्वी आला होता. चाळीस वर्षांच्या पुरुषाव्यतिरिक्त सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाने सांगितले होते. अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षातून धामणगाव रेल्वे येथे घरी पाठवण्यात आले होते. 

दरम्यान, डिस्चार्ज देताना नऊ जुलैला मृताच्या पत्नीचे अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात थ्रोट स्वाब घेतले होते. त्यानंतर हे सर्व धामणगाव येथे आपल्या घरी क्वारंटाईन होते. मात्र, रविवारी (ता. 12) सकाळी जिल्हा वैद्यकीय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालात सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने धामणगाव तालुका हादरला आहे. तर दुसरीकडे चार दिवसांपूर्वी निगेटिव्ह आलेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. 
 

श्री विहार कॉलनी सील 

धामणगाव रेल्वे तालुक्‍यात अवघ्या बारा तासात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासन ऍक्‍टिव्ह झाले असून, राठीनगर परिसरातील श्री विहार कॉलनी परिसर व तळेगाव दशासर येथील परिसर सील करण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे, नगर अभियंता शैलेंद्र मेटे आदी उपस्थित होते. दरम्यान, कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले असून, परिसर निर्जंतुक करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. 
 

एकाच कुटुंबातील तिघे बाधित 

येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याच कुटुंबातील एका 75 वर्षीय पुरुषाचा 29 जूनला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले होते. 
संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman who was discharged from the separation room was positive