भले शाबास! मुंबई, नागपूरनंतर आता यवतमाळात रणरागिणींच्या हाती पोलिस वाहनाचे स्टिअरिंग

सूरज पाटील
Thursday, 13 August 2020

पोलिस दलात आतापर्यंत पुरुष कर्मचारीच वाहनचालक म्हणून कर्तव्य बजावत होते. आता त्यात महिला कर्मचाऱ्यांचीही भर पडणार आहे. पहिल्यांदा स्टिअरिंग सांभाळताना थोडी चिंता व भीती वाटली होती. आपण वाहन चालवू शकणार का, असा प्रश्‍न सतावत होता. प्रशिक्षणानंतर भीती दूर झाली. आता अवजड व लाइट वेट वाहनेही या महिला चालवित आहेत.
 

यवतमाळ : महिला आज प्रत्येकच क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून यशोशिखर पादाक्रांत करीत आहेत. शिस्तीच्या पोलिस खात्यातही महिला विविध पदांवर आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आता रणरागिणींच्या हाती पोलिस वाहनांचे स्टिअरिंगही येणार आहे. अकरा महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांचा मोटारवाहन विभागामार्फत सराव सुरू आहे.

पोलिस दलात आतापर्यंत पुरुष कर्मचारीच वाहनचालक म्हणून कर्तव्य बजावत होते. आता त्यात महिला कर्मचाऱ्यांचीही भर पडणार आहे. पहिल्यांदा स्टिअरिंग सांभाळताना थोडी चिंता व भीती वाटली होती. आपण वाहन चालवू शकणार का, असा प्रश्‍न सतावत होता. प्रशिक्षणानंतर भीती दूर झाली. आता अवजड व लाइट वेट वाहनेही या महिला चालवित आहेत.

महिला पोलिस कर्मचारी विविध पोलिस ठाण्यांत कार्यरत होत्या. पोलिस दलात पुरुषांप्रमाणे महिलांनादेखील कर्तव्य बजावावे लागते. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात एकही महिला पोलिस वाहनांचे चालक म्हणून कार्यरत नव्हती. दरम्यान, पोलिस विभागात कार्यरत व इच्छुक महिलांना वाहनचालक होण्याची संधी उपलब्ध झाली. त्याद्वारे ११ महिलांनी वाहन चालकपदासाठी अर्ज केला. नवीन चॅलेंज स्वीकारत पुणे जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केले. सध्या त्या मोटारवाहन विभागात सराव करीत आहेत. मुंबई, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांनंतर लवकरच यवतमाळ जिल्ह्यातही रणरागिणी वाहनचालक म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.

सविस्तर वाचा - सावत्र आईने प्रियकराच्या मदतीने केला मुलाचा खून

इतरांना मिळणार प्रोत्साहन
महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी चालकपदासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, सराव सुरू आहे. चालक प्रशिक्षणासाठी या महिला कर्मचारी स्वत:हून पुढे आल्या आहेत. त्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळणार आहे.
राजेंद्र जाधव, मोटार परिवहन अधिकारी, यवतमाळ.

यांनी स्वीकारले चॅलेंज
पोलिस दलात चालक म्हणून कर्तव्य बजावण्याचे चॅलेंज स्विकारणाऱ्यांमध्ये अश्‍विनी कंठारे, बबीता राठोड, प्रिया मुंदेकर, शुभांगी डेहणकर, माला वानखडे, अलका कांबळे, बिंदू जोगळेकर, दीपाली भेंडारे, निशादबी पठाण, शिवानी शिंदे, पूजा बनसोड यांचा समावेश आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women police are now drivers of police vehicles