नागपूरच्या मैदानावर "पंच'गिरी करतेय ही महिला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

19 वर्षे मुलांचा सामना असला, तरी मैदानावर वावरताना त्यांच्या देहबोलीतून आत्मविश्‍वास स्पष्टपणे झळकत होता. धावबादचा निर्णय असो वा खेळाडूंना सूचना देण्याची वेळ, त्या परिस्थिती उत्तम पद्धतीने हाताळताना दिसून आल्या. 

नागपूर : पुरुषांचे वर्चस्व असलेल्या भारतीय क्रिकेटमध्ये महिलेचा सहभाग हा तसा नगण्यच. त्यामुळे पुरुष किंवा मुलांच्या क्रिकेट सामन्यात एखादी महिला पंच म्हणून उभी असेल तर अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसतो. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर 19 वर्षे मुलांच्या कूचबिहार करंडकातील चारदिवसीय सामन्यासाठी वृंदा राठी यांना मैदानात पाहून उपस्थितांना असाच आश्‍चर्याचा धक्का बसला. 

देहबोलीतून स्पष्टपणे झळकतो आत्मविश्‍वास 
मुंबईकर असलेल्या वृंदा या बीसीसीआयतर्फे आयोजित पुरुष किंवा मुलांच्या सामन्यात मैदानावरील पंच म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पहिल्या पंच मानल्या जातात. बीसीसीआयची सामनाधिकाऱ्यांसाठी असलेली लेव्हल-2 परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे आणि आता पुरेसा अनुभव असल्याने 30 वर्षीय वृंदा पुरुषांच्या सामन्यात पंचगिरी करण्यासाठी पात्र ठरल्या आहेत.

19 वर्षे मुलांचा सामना असला, तरी मैदानावर वावरताना त्यांच्या देहबोलीतून आत्मविश्‍वास स्पष्टपणे झळकत होता. धावबादचा निर्णय असो वा खेळाडूंना सूचना देण्याची वेळ, त्या परिस्थिती उत्तम पद्धतीने हाताळताना दिसून आल्या. 

क्लिक करा - फुलपाखरांची मराठी नावे माहीत आहेत का?

सामनाधिकारी आसामच्या रजनी कलिता 
फलंदाजांनी वेळकाढू धोरण स्वीकारल्यावर एक मिनिट वाया गेल्याची सूचना स्कोअरर करण्यास त्या विसरल्या नाही. न्यूझीलंडच्या महिला पंच कॅथी क्रॉस यांच्या कामगिरीपासून प्रेरणा घेत वृंदा यांनी पंच म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. उमेदीच्या काळात मध्यमगती गोलंदाज असलेल्या वृंदा यांच्याकडे टी-20 सामन्याचाही अनुभव आहे.

महिला असल्या तरी आज मिहीर परमार या आपल्या पुरुष सहकाऱ्यासोबतचा त्यांचा मैदानावरील समन्वयक उत्तम होता. विशेष म्हणजे, या सामन्यात वृंदा या केवळ एकमेव महिला नाहीत. या सामन्याच्या सामनाधिकारी आसामच्या रजनी कलिता यासुद्धा महिला आहेत. त्यामुळे तिच्या हाती पाळण्याची नव्हे, सामन्याची दोरी असे म्हटले तर वावगे ठरू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women umpire in cricket tournament at nagpur