"नाजूक' प्रश्‍न सोडविण्यासाठी संकोच 

केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नागपूर - आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी जशी उत्तम आहाराची गरज आहे, तसेच स्वच्छ वातावरणाचीदेखील आवश्‍यकता आहे. निसर्गाने स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा दिली असली, तरी उघड्यावरील शौचविधीमुळे हवा, पाणी दूषित होत आहेत. गावखेड्यांत 70 टक्के कुटुंबांकडे शौचालय नसल्याने शौचविधीसाठी भल्या पहाटे किंवा रात्रीच्या अंधाराच्या प्रतीक्षेत ते असतात. शहरात बाजार परिसरात स्वच्छतागृहांअभावी ग्राहकांची कुचंबणा होते, असे विदारक वास्तव पुढे येत आहे. 

नागपूर - आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी जशी उत्तम आहाराची गरज आहे, तसेच स्वच्छ वातावरणाचीदेखील आवश्‍यकता आहे. निसर्गाने स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा दिली असली, तरी उघड्यावरील शौचविधीमुळे हवा, पाणी दूषित होत आहेत. गावखेड्यांत 70 टक्के कुटुंबांकडे शौचालय नसल्याने शौचविधीसाठी भल्या पहाटे किंवा रात्रीच्या अंधाराच्या प्रतीक्षेत ते असतात. शहरात बाजार परिसरात स्वच्छतागृहांअभावी ग्राहकांची कुचंबणा होते, असे विदारक वास्तव पुढे येत आहे. 

स्वच्छतागृह ही अनिवार्य अशी मूलभूत गरज मानली गेली आहे; परंतु ग्रामीण भागात घरामध्ये स्वच्छतागृह बांधण्याची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही. लोकांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, लोकांनी शौचालये बांधावीत यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्वच्छतागृह दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही "स्वच्छ भारत'चा नारा द्यावा लागला आहे; परंतु आजचे चित्र बघितल्यास स्वातंत्र्याच्या साठीनंतरही महाराष्ट्रात अवघी सहा शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. कागल, मुरगुड, पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर), वेंगुर्ले (जिल्हा सिंधुदुर्ग), पाचगणी (जिल्हा सातारा) ही शहरे मुक्त झाल्याचा गाजावाजा करण्यात धन्यता मानली जात आहे. पण, राज्यात महिलांची संख्या पाच कोटी 40 लाख आहे. महिला हा केंद्रबिंदू ठेवून स्वच्छतागृहाची सुलभ संकल्पना पुढे यावी, असे स्वच्छतादूत चळवळीतील कार्यकर्ते आशुतोष नाटकर यांनी सांगितले. 

खेड्यात हागणदारीची समस्या कायम 

महाराष्ट्रात 43 हजार 137 खेडी आहेत. 27 हजार 873 ग्रामपंचायती आहेत. जिल्हा परिषदेने आखून दिलेल्या धोरणानुसार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आजही हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न होतात. तरीदेखील गावखेड्यातील महाराष्ट्र उघड्यावर शौच करताना दिसतो. हागणदारीची समस्या कायम आहे. ग्रामीण भागात सुमारे 70 टक्के कुटुंबांकडे शौचालयाची सोय नाही. 

"नाली' म्हणजेच शौचालय 

शहरी भागात झोपडपट्ट्यांचे पीक आलेले आहे. राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. झोपडपट्टीसमोरून वाहणाऱ्या नाल्यांवर मुले शौचाला बसतात, तर नाल्याच्या काठावर शौचाला बसण्याची सवय अद्याप गेली नाही. झोपडपट्ट्यांमध्ये जागेची समस्या कायम आहे. यामुळेच उघड्यावर बसणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही, दंड ठोठावल्यानंतरही "हागणदारीमुक्त'चे धोरण कागदावरच दिसते. 

मूत्राशयाचे आजार वाढण्याचा धोका 

बाजारपेठांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. असली तरी त्यांची अवस्था वाईट असते. त्याचा फटका महिलांना बसतो. ""शहरात प्रत्येक दोन ते तीन किलोमीटरच्या परिघात महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत. काही स्वच्छतागृह परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर असतो, यामुळे महिला तेथे जाणे टाळतात. लघवी रोखून धरावी लागते, यामुळे लघवीचे आजार बळावतात, आरोग्यावर परिणाम होतो, किडनीवर ताण पडतो. मूत्राशयाच्या पिशवीमध्येही विविध प्रकारच्या समस्या उद्‌भवतात,'' असे स्त्रीरोग व प्रसूतिरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांचे म्हणणे आहे. 

तृतीयपंथींसाठी स्वच्छतागृह 

सार्वजनिक स्वच्छतागृहांसमोर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह असे लिहिलेले असते; परंतु तृतीयपंथींसाठी वेगळे स्वच्छतागृह, शौचालय नसते. मुंबईत बैंगनवाडी परिसरात तृतीयपंथींसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. तृतीयपंथींसाठी स्वच्छतागृह असावे, असा आदेशही न्यायालयाने 2015 मध्ये दिला होता. तृतीयपंथींची संख्या कमी असल्याने याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, ही शोकांतिका नागपूरच्या चमचमने व्यक्त केली. 

"सुलभ' नसे जे... 

महाराष्ट्रात "सुलभ शौचालय' ही चळवळ उभी होत असल्याचे दिसत असतानाच, अलीकडे ही "सुलभ' मोहीम थंडावली आहे. सरकारी रुग्णालये, मार्केट परिसर, लाल बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी "सुलभ'ची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे; परंतु "सुलभ' नसे जे... असे म्हणण्याची पाळी आली आहे. 

घरकाम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत नोकरदार महिलांमध्ये लघवीचे आजार वाढत आहेत. ओटीपोटाच्या आजारासोबतच मूत्राशयाच्या आजारांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. कमी पाणी पिणे, लघवी रोखून धरणे ही त्याची कारणे आहेत. शहरात महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध झाल्यास त्या पाणी पिण्यासह इतर प्राकृतिक नियमांचे पालन करतील. 

- डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ, नागपूर

Web Title: World Toilet Day