
यवतमाळ शहरात तीन, बाभूळगाव तालुक्यांत दोन व नेर तालुक्यात एक याप्रमाणे एकूण सहा प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील एकाच भागात वास्तव्य असलेल्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.
यवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन डोळ्यात तेल घालून दिवसरात्र काम करीत आहे. दररोज पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी "कन्टेन्मेंट प्लॅन' तयार केला आहे. त्यात पुन्हा सील करण्यात आलेल्या भागाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सोमवारी (ता. 27) दिवसभरात 13 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्यांची संख्या 63 झाली आहे.
आठ एप्रिलला आठ पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने प्रभाग दहा व वीसमधील परिसराला सील करण्यात आले. आतापर्यंत 350 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या एकाच भागातून आतापर्यंत 47 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. संपर्कात आलेल्या लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी सील केलेल्या भागातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने शहरातील चापमनवाडी, तारपुरा, शिंदेनगर, आठवडीबाजार, अलकबीरनगर, विदर्भ हाऊसिंह सोसायटी, शुभंकर रोड, सुदर्शन रोड या भागाला सील करण्यात येणार असून, संभाव्य प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत कर्तव्य करण्याची मुभा राहणार आहे. अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना नगरपालिकेच्या वतीने पासेस देण्यात येणार आहेत.
अवश्य वाचा- `...या जिल्ह्यातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नागपूर कनेक्शन`
आतापर्यंत एकूण एक हजार 121 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 899 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 73 अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उपचारानंतर दहा जणांना सुट्टी देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात 63 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात यवतमाळ शहरात तीन, बाभूळगाव तालुक्यांत दोन व नेर तालुक्यात एक याप्रमाणे एकूण सहा प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील एकाच भागात वास्तव्य असलेल्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.
जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने यवतमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शहरात दुचाकी वाहन पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी व अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आलेले नागरिक व स्वयंसेवक यांना मुभा आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून दुचाकी वाहनांना पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी निर्गमित केले आहे.
मार्च महिन्यातील तीन रुग्ण सोडले तर जिल्ह्यात संसर्गाच्या केसेस कमी झाल्या होत्या. मात्र दिल्ली कनेक्शनमुळे त्याची व्याप्ती वाढली. त्यामुळे प्रशासनाने सहा प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. यापैकी पाच क्षेत्रातून एकही पॉझिटिव्ह केस नाही. सर्व केसेस केवळ एकाच भागातून येत असल्यामुळे या भागात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या 73 जणांपैकी 43 पुरुष आणि 30 महिला आहेत.
प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागाला यापूर्वी सील करण्यात आले, हा भाग कन्टेंन्मेट झोन म्हणून कायम राहील. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांवर उपचार करण्यात येत आहे.
-एम. देवेंदर सिंह,
जिल्हाधिकारी, यवतमाळ.