
यवतमाळ : कधी काळी राज्यात नावलौकिक असलेल्या नगरपालिकांमध्ये यवतमाळच्या नगरपालिकेचीदेखील ओळख होती. आदर्श मॉडेल म्हणून राज्यस्तरावर यवतमाळ नगरपालिकेचा गौरवदेखील झाला. अनेक पुरस्कारांवर यवतमाळ नगरपालिकेने आपले नाव कोरले. राजकीय रस्सीखेच वाढल्याने "अ' वर्ग असलेल्या नगरपालिकेचा कारभार मात्र, ढेपाळला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत, तर नागरिकांच्या संयमांची आता परीक्षाच घेतली जात आहे. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात कचरा साचला असल्याने यवतमाळकरांची "वाट' दिवसेंदिवस बिकटच बनत चालली आहे.
बाळासाहेब चौधरी यवतमाळचे नगराध्यक्ष असताना नगरपालिकेने राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्या काळात राज्यातील इतर नगरपालिकेसमोर यवतमाळ नगरपालिकेचा आदर्श होता. अनेक जिल्ह्यांतील पथकांनी यवतमाळ नगरपालिकेला भेटी दिल्या होत्या. संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियानात नगरपालिकेने राज्यभर आपल्या कार्याचा डंका वाजविला होता. सध्या राजकीय हेवेदावे, वर्चस्वाची लढाई, राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेली श्रेयवादाची चढाओढ यामध्येच नगरपालिकेचा कारभार ढेपाळल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे.
सध्या यवतमाळ शहरातील रस्ते, स्वच्छता व हद्दवाढ झालेल्या भागांतील नालीचा प्रश्न मोठा बिकट बनला आहे. चर्चा, आंदोलने, भेटीगाठी होऊनही यावर तोडगा निघालेला नाही. हद्दवाढ झालेल्या भागांतील रस्त्यांचा प्रश्न असतानाच आता यवतमाळ शहरातील रस्त्यांचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याऐवजी विविध कारणांसाठी खोदकाम सुरू आहे. काही भागांत नव्याने रस्ते करण्यात आलेत. मात्र, ते रस्तेही फोडण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते करून काहीच फायदा झाला नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील कचऱ्यावर महिन्याकाठी जवळपास 70 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे.
यानंतरही शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटलेला दिसत नाही. उलट मुख्य चौकातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत. परिणामी, स्वच्छतेचा पैसा चालला कुठे, असा प्रश्नदेखील नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरात विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात इतका निधी खर्च झाल्याचे कुठेही दिसत नाहीत. उलटस्थिती पूर्वीच्या तुलनेत अधिक गुंतागुंतीची झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वराह प्रकडण्यावरही मोठा खर्च करण्यात आला. मात्र, यानंतरही शहरातील अनेक भागांत वराहांचा मुक्तसंचार सुरू असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी नगरपालिकेच्या विशेष सभेत केल्या आहेत. त्यानंतरही कोणताच तोडगा निघालेला दिसत नाही, हे विशेष.
पालिकेचा कारभार कुणाच्या हाती?
यवतमाळ नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष, भाजपचे बहुमत, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष नगरसेवक आहेत. यवतमाळ शहरातील रस्ते, नाली, स्वच्छता या विषयांवर सर्वांचीच ओरड सुरू आहे. सर्वपक्षीय नगरसेवक दोषींवर कारवाई करण्याची मागणी करतात. मात्र, अजूनही या सर्व प्रकरणांना कोणी दोषी आहेत, हेच सापडल्याचे दिसत नाही. त्यामुळे नगरपालिकेचा कारभार नेमके चालवतेय तरी कोण, असा प्रश्नदेखील नागरिकांना पडला आहे.
कचरा संकलनाच्या ठेक्यावरून नेहमीच वादाचे प्रसंग उभे झालेले आहेत. कचऱ्याचा ठेका रद्द करण्याची वेळ नगरपालिकेवर आली होती. मात्र, त्यानंतरही सुधारणा झालेली दिसत नाही. सध्या कचऱ्याचा ठेका व घंटागाडी ठेक्याची मुदत संपली असून, मुदतवाढीवर स्वच्छतेचा ठेका सुरू आहे. असे असले तरी शहरवासीयांची "वाट' सोपी होण्यापेक्षा अधिकच बिकट झालेली दिसून येत आहे. काही दिवसांत नवीन ठेका निघणार आहे. यावेळी तरी शहराची स्वच्छता होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.