सरकार, आमचं पण जगणं मान्य करा... जिवापाड जपलेला काकडीला स्वत:च संपविले

yavatmal farmer
yavatmal farmer

दारव्हा (जि. यवतमाळ) : पन्नास हजार लागवडीचा खर्च आला. काकडी जोमात आली. ऐन तोडायच्या वेळेलाच लॉकडाउन झाले. काकडीचे भाव पडले. उठावच नाही. व्यापार्‍यांनीही पाठ फिववली. शेवटी पाणी देऊन काय फायदा, असे म्हणत शेतकर्‍याने काकडीचे ओलीतच बंद केले. जिवापाड जपलेला काकडीला पाणी बंद करून स्वत:च संपविले. सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. काकडी आजही तशीच करपलेल्या वेलीला लटकून आहे. करपलेल्या काकडीच्या वेली मात्र शेतकर्‍यांची व्यथा सांगत आहे. मन सुन्न कारणारी ही घटना तालुक्यातील खोपडी येथील आहे.

लॉकडाउन पुन्हा झाल्याने तीन एकरातील पपईला ग्राहक मिळाले नाही. व्यापारी शेताकडे फिरकले नाही. अखेर नाइलाजने उभ्या पपईच्या शेतात रोटावेटर फिरवून पीकच नष्ट केले. दीड एकरावर टरबूज लावले, त्यालाही उठाव नाही. त्यामुळे घरोघरी जाऊन फक्त पाच रुपये किलोने टरबूज विकले. कसाबसा टरबूज लागवडीचा खर्च काढला. एव्हढ्यावरच या शेतकर्‍याची विदारक कथा संपत नाही. तर डिसेंबरमध्ये काकडीची लागवड केली. बियाणे, खते, पाणी, निंदण करीत 50 हजार रुपये लागवडीचा खर्च केला. काकडीचे वेल चांगले तरारले.

करपलेल्या वेली सांगतात शेतकर्‍याची व्यथा
वेलीला काकड्या लदबदू लागल्या. काकडीच्या वजनाने वेल खाली घसरू नये वा तुटू नये, म्हणून वेलीला लोखंडी तारांचा आधार दिला. वाटलं दोन लाखांची काकडी आपल्याला होणार. काकडी ऐन भरात आली असताना दुसर्‍यांदा लॉकडाउन झाले. यातच शेतकर्‍याचा घात झाला. काकडीला गिर्‍हाईक मिळेना. बाजारात उठाव नाही. काकडी खरेदी करणारे व्यापारीही गायब झाले. शेवटी होत्याचे नव्हते झाले.

आता काकडीच्या वेलीला पाणी देत का जपायचे? असा प्रश्‍न शेतकर्‍याला पडला. त्याने जिवापाड जपलेल्या काकडीच्या वेलीला पाणी देणे बंद करीत काकडीचा वेलच कापून टाकला. आजही दारव्हा-खोपडी मार्गालगत असलेल्या दीपक क्षीरसागर यांच्या शेतातील करपलेल्या वेलीला लटकलेल्या काकड्या येणार्‍या जाणार्‍यांना एका शेतकर्‍यांचे दु:ख सांगतात. काकडी गेली, टरबूज गेले, पपई गेली आणि लाखोंचा फटका शेतकर्‍यांना बसला.

अशी मन सुन्न करणारी कहाणी आहे खोपडीच्या दीपक क्षीरसागर या शेतकर्‍याची. तालुक्यातील हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. खरच अशा प्रकारे तालुक्यातील फळ-भाजीपाला पिकविणार्‍या इतर शेतकर्‍यांची कहाणी यापेक्षा वेगळी नाही. ’कोरोना’चा इतका भयानक ’इफेक्ट’ ग्रामीण भागात झाल्याचे दिसत आहे. एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला आहे. याकडे सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

’लॉकडाउन’मुळे मी तीन एकरांतील पपई रोटावेटर फिरवून नष्ट केली. टरबूज दारोदारी अल्पदरात विकून कसाबसा लागवडीचा खर्च वसूल केला. काकडीला उठाव नव्हता. भावही नव्हता आणि व्यापारीही नव्हते. त्यामुळे काकडीचे पाणी बंद करून टाकले. जिवापाड जपलेल्या काकडीच्या वेलांना मीच संपविले. पपई गेली, काकडी गेली, टरबूजही गेले. या सर्वामुळे माझे 13 लाखांचे नुकसान झाले आहे.
- दीपक क्षीरसागर,
शेतकरी खोपडी मिरासे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com