गुटखातस्करांचे काळे धंदे आता होणार बंद; यवतमाळ पोलिसांनी तयार केला  'ऍक्‍शन प्लॅन' 

Yavatmal police made action plan against tobacco smugglers
Yavatmal police made action plan against tobacco smugglers

यवतमाळ : राज्यासह जिल्ह्यात गुटखाबंदी असली तरी चोरट्या मार्गाने होणारी विक्री थांबली नाही. त्यातून गुटखातस्कर चांगलेच गब्बर बनले आहेत. गुटखातस्करांचे कंबरडे मोडण्यासह तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी "ऍक्‍शन प्लॅन' तयार केला आहे. येत्या जानेवारीपासून जिल्ह्यात "एपीजे अब्दुल कलाम गुटखामुक्त अभियान' राबविण्यात येणार आहे.

राज्यात गुटखाबंदी आहे. मात्र, लगतच्या राज्यांत निर्मित होणारा गुटखा चोरट्या मार्गाने जिल्ह्यात आणला जातो. जिल्ह्यात गुटखातस्करांचे नेटवर्कही मोठे आहे. गावागावांत गुटखा पोहोचवून पानटपरी, किराणा दुकानांतून त्याची विक्री केली जाते. गुटखा खाणे आरोग्याला हानिकारक आहे. हे अनेकांना माहिती आहे. तरीदेखील तरुणांसह लहान मुलेही व्यवसानाच्या आहारी गेले आहेत. 

पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी गुटखाविक्रीला प्रतिबंध करण्यात यश आले नाही. त्यामुळेच महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाच्या धर्तीवर "एपीजे अब्दुल कलाम गुटखामुक्त अभियान' राबविण्यात येणार आहे. "गुटखाबंदीकडून गुटखा मुक्तीकडे', अशी टॅग लाइन देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अडीचशे गावांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

गुटखाविक्रीला प्रतिबंध घालण्यासह जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर समिती गठित करण्यात येईल. त्यात तरुण, महिला यांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेण्यात येईल. गाव गुटखामुक्त झाल्यास चोरट्या मार्गाने होणारी विक्री थांबेल व तरुणही व्यसनापासून दूर राहतील, असा ऍक्‍शन प्लॅन आहे.

समितीला विशेष अधिकार

गुटखामुक्तीसाठी गावपातळीवर समिती गठित करण्यात येणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाच्या धर्तीवरच गुटखामुक्त अभियान राहणार आहे. गावात होणारी गुटखाविक्री रोखण्यासाठी समितीला विशेष अधिकार देण्यात येणार असून, विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल.

जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल

कर्नाटक व आंध्र प्रदेशांतून जिल्ह्यात गुटखातस्करी केली जाते. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी विविध युक्‍त्याही केल्या जातात. गुटखातस्करीतून जिल्ह्यात महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यवतमाळ, आर्णी, महागाव, फुलसावंगी, दारव्हा, दिग्रस, नेर, पाटणबोरी हे गुटखातस्करांचे मुख्य केंद्र बनले आहे. 

जानेवारी महिन्यात एपीजे अब्दुल कलाम गुटखामुक्त अभियान जिल्ह्यातील अडीचशे गावांत राबविण्यात येणार आहे. "गुटखाबंदीकडून गुटखामुक्तीकडे', अशी टॅग लाइन देण्यात आली आहे. गावात एक समिती गठित करण्यात येणार असून, त्यात तरुण, महिलांना सहभागी करून घेण्यात येईल. त्यामुळे गुटखाविक्रीला आळा बसल्याशिवाय राहणार नाही.
- डॉ. दिलीप पाटील भुजबळ,
 पोलिस अधीक्षक, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com