अस्थिविसर्जन करून परतताना आठ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नातेवाइकाच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या आठ जणांचा घरी परतताना अपघातात मृत्यू झाला. एका वाहनचालकाच्या चुकीमुळे हा अपघाता घडला. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले. ही घटना कळंब ते जोडमोहा मार्गावर घडली.

यवतमाळ : नातेवाइकांचे अस्थिविसर्जन करून गावी परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

हा अपघात कळंब ते जोडमोहा मार्गावर वाढोणा गावाजवळ असलेल्या गिट्टीखदानजवळ रविवारी (ता. 16) सायंकाळी सव्वासहा दरम्यान घडला.

दोघांची नावे कळू शकली नाही

चालक अमर आत्राम (वय 29), महादेव चंदनकर (वय 54), कृष्णा प्रसन्नकर (वय 55), संभाजी मेश्राम (मोरगाव, जि. अकोला) यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात अंजना वानखेडे (वय 80) व सरस्वती दाभेकर (वय 80) दोघेही रा. जोडमोहा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच ते सहा जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांपैकी दोघांची नावे कळू शकली नाही. इतर किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली, अशी माहिती अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांनी दिली.

जोडमोहाजवळील अपघात

जोडमोहा येथील वानखेडे कुटुंबीय आपल्या नातेवाइकांसह बाबाराव वानखेडे यांच्या अस्थिविसर्जनासाठी कोटेश्‍वर येथे खासगी वाहनाने रविवारी सकाळी गेले होते. कोटेश्‍वरवरून परतताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळले व बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले. सर्व जखमींना यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोडमोहा येथील नागरिकांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना वाहनाने यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले.

अपघातातील जखमींची नावे

नरेंद्र (वय 40), किरण वानखेडे (वय 32), सचिन मेश्राम (35), सुमित्रा काळे (65), शिवम (14), प्रकाश सोनटक्के, बेबी सोनटक्के (70), रवी वानखडे, संदीप वानखडे, यश रामटेके, संदीप लोखंडे, पंकज सोनुले (30), उमेश वेट्टी (35), आकाश हिवरे (30), शरद ठाकरे (वय 30).

हेही वाचा : त्या चौघी आंघोळीला गेल्या अन्‌ घडला असा प्रसंग... प्रश्नचिन्हतील घटना

नातेवाइकांचा आक्रोश

अपघात होताच मृतदेहांचा खच बघून जखमी अवस्थेतीत नातेवाइकांनी आक्रोश केला. अपघातस्थळी एकच गर्दी झाली होती. उपस्थितांनाही आपले अश्रू रोखता आले नाही. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आलेल्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal unfortunate accident eight person death