शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारली; जिल्हा प्रशासनाचे आदेश; कोरोनाचं कारण 

राजकुमार भितकर 
Thursday, 18 February 2021

कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या विरोधात शेतकर्‍यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण आता इतर राज्यातही पसरत आहे. केंद्र शासनाच्या या कायद्याविरोधात किसान संयुक्त मोर्चा राज्यभर सभा घेत आहे. 

यवतमाळ : केंद्र सरकारने कृषिक्षेत्राशी संबंधित पारीत केलेल्या तीन कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तुघलकी कृषी कायदे परत घेण्यासाठी व केंद्र सरकारविरुद्ध बिगूल फुंकण्यासाठी शनिवारी (ता. 20) येथील आझाद मैदानावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा होणार होती. मात्र, कोरोनाचे कारण देत प्रशासनाने जाहीर सभेची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ऑनलाइन सभा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - बिग ब्रेकिंग: अमरावतीत रविवारी संचारबंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय; कोरोनाबाधितांमध्ये वाढ

कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या विरोधात शेतकर्‍यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण आता इतर राज्यातही पसरत आहे. केंद्र शासनाच्या या कायद्याविरोधात किसान संयुक्त मोर्चा राज्यभर सभा घेत आहे. 

यवतमाळ येथील आझाद मैदान येथे शनिवारी (ता. 20) जाहीर सभा होणार होती. त्यासाठी शेतकरी वारकरी संघटनेने प्रशासनाला सभा तसेच पोलिस बंदोबस्ताची परवानगी मागितली होती. जिल्हा प्रशासनाने पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून अहवाल मागितला होता. पोलिस अधीक्षक यांच्या अहवालानुसार सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. 

हेही वाचा - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रेल्वेस्थानकावर आंदोलन; आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झटापट

कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. सभेकरिता विविध भागातून शेतकरी बांधव येणार आहेत. त्यामुळे शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किसान संयुक्त मोर्चाच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र बुधवारी (ता. 17) अपर जिल्हा दंडाधिकारी ललीतकुमार वर्‍हाडे यांनी दिले आहे. याच सभेला किसान संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत मार्गदर्शन करणार होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal ZP denied rally of Rakesh Tikait