होय हे खरे आहे, वैनगंगेने गिळली शेती ! 

सहदेव बोरकर 
Tuesday, 21 July 2020

परंतु, श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात रेंगेपार या गावाचे पुनर्वसन रखडले. शेवटी धोक्‍याच्या पातळीत आलेल्या काही कुटुंबांना शासकीय योजनेतून घरकुल देण्यात आले. आता ही कुटुंबे नवीन वसाहतीत राहत आहेत. 

सिहोरा(भंडारा) : तुमसर तालुक्‍यातील बपेरापासून वैनगंगेचे पात्र विस्तारत आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत शेकडो शेतकरी भूमिहीन झाले. प्रशासनाकडून रेंगेपार येथील काही घरांचे पुनर्वसन केले. मात्र, भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणार कधी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या वैनगंगेला बपेरा येथे बावनथडी नदी मिळते. त्यानंतर जिल्ह्यात वाहणाऱ्या वैनगंगेचे पात्र गेल्या 20 वर्षांपासून विस्तारत आहे. यामुळे नदीकाठावरील बपेरा, रेंगेपार, पिपरीचुन्नी, वांगी, मांडवी आदी गावे धोक्‍याच्या पातळीत आली. नदीकाठावरील शेकडो शेतकऱ्यांची शेतजमिन दरवर्षी कमीकमी होत आहे. नदीला येणाऱ्या पुरामुळे काठावरील गावांत पावसाळ्यात पाणी शिरते. कमी उंचीच्या पुलावर पुराचे पाणी आल्यास ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प होते. यामुळे गावकऱ्यांचा संपर्क तुटतो. 

हे वाचा—आश्रय देणाऱ्यानेच केला घात; सहनशीलतेचा झाला अंत आणि...

नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असल्याने काठावरील शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची शेती कमी झाली आहे. दोन्ही काठांवरील काही अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे बेपत्ता झाली आहे. ज्यांनी विहिरी बांधल्या किंवा कर्ज घेतले. त्यांच्या सातबारावर फक्त विहीर व कर्जाच्या नोंदी आहेत. मात्र, प्रत्यक्षात शेती वाहून गेली आहे. असे शेकडो शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याबाबत समस्या निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे कोणतीही योजना नाही. पुराच्या आपत्तीमुळे हे शेतकरी संकटात आल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

रेंगेपारचे अंशतः: पुनर्वसन 
नदीचे पात्र दरवर्षी पुढे सरकत असल्याने रेंगेपार या गावातील काठावरील काही घरे वाहून जाण्याचे संकट आले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी सतत दोन ते तीन वर्षे आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयानंतर हे प्रकरण मंत्रालयात गेले. परंतु, श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात रेंगेपार या गावाचे पुनर्वसन रखडले. शेवटी धोक्‍याच्या पातळीत आलेल्या काही कुटुंबांना शासकीय योजनेतून घरकुल देण्यात आले. आता ही कुटुंबे नवीन वसाहतीत राहत आहेत. 

कुटुंबाची दोन एकर शेती नदीच्या पात्रात वाहून गेली आहे. आणखी बऱ्याच शेतकऱ्यांची शेतीवाहून गेली आहे. त्याबाबत शासनाच्या विभागाला सांगितले. परंतु, कोणतीही उपाययोजना झाली नाही. 
-रुपाबाई छगनलाल खंगार, भूमिहीन शेतकरी, बपेरा. 

-संपादन : चंद्रशेखर महाजन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes it is true, Waingange swallowed agriculture!