युवा शेतकऱ्याची स्वतःचे सरण स्वतः रचत आत्महत्या

फिरोज शेख
सोमवार, 30 जुलै 2018

सिंदखेडराजा : कर्जमाफीच्या यादीत स्वतःचे नाव नाही, त्यामुळे पुन्हा पीक कर्ज मिळाले नाही. आर्थिक संकटामुळे प्रपंच चालविणे कठीण झाल्याने तालुक्यातील सावखेड तेजन येथील एका 39 वर्षीय युवा शेतकऱ्याने स्वतःचे सरण स्वतः रचत आत्महत्या केल्याची घटना काल दि. 29 जुलै, रविवारी सकाळी उघडकीस आली. 

सिंदखेडराजा : कर्जमाफीच्या यादीत स्वतःचे नाव नाही, त्यामुळे पुन्हा पीक कर्ज मिळाले नाही. आर्थिक संकटामुळे प्रपंच चालविणे कठीण झाल्याने तालुक्यातील सावखेड तेजन येथील एका 39 वर्षीय युवा शेतकऱ्याने स्वतःचे सरण स्वतः रचत आत्महत्या केल्याची घटना काल दि. 29 जुलै, रविवारी सकाळी उघडकीस आली. 

सावखेड तेजन येथील 39 वर्षीय शेतकरी गजानन अर्जुन जायभाये यांच्याकडे तीन एकर शेती होती. मागच्या वर्षी पीक कर्जाच्या रुपात बँक ऑफ महाराष्ट्र कडून त्यांनी 70 हजार रु. घेतले होते. यावर्षी कर्जमाफी झाल्याची घोषणा झाल्यानंतर गजानन जायभाये यांचे नाव त्या यादीत आले नव्हते. यासर्व गोंधळामुळे नवीन पीक कर्ज प्रकरण झाले नव्हते. त्यातच पेरणीसाठी गजानन जायभाये याने उसनवारी करीत बी-बियाणे, खताची जुळवाजुळव केली होती.

सततची नापीकी, डोक्यावर कर्ज, त्यातच यावर्षीही निसर्ग कोपलेला यामुळे संसाराचा गाडा चालविणे या आर्थिक अडचणीमुळे गजानन जायभाये हा चिंताग्रस्त झाले होते. काल दि. 29 जुलै, रविवारी दिवस उगवायच्या आत अगदी भल्या पहाटेच आडगावराजा मार्गावरील शेतात गेला होता. त्यानंतर काही वेळाने त्याचे वडील अर्जुन सखाराम जायभाये शेतात गेले. तेंव्हा त्यांना तेथे रचलेले सरण व त्यावर गजाननचा जळालेला देह दिसून आला. यासंदर्भात गावात माहिती होताच पोलिसांना माहिती देत अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे गजाननचे कपडे, विषारी औषधाची बाटली, रॉकेलचा डबा आदि साहित्य आढळून आले.

ठाणेदार बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठाणेदार संतोष नेमणार, राजू घोलप, बालाजी फलटणकर आदिंनी घटनास्थळी पोहोचुन पंचनामा केला. यावेळी गजानन याने शेतात येऊन स्वतःसाठी सरण रचले, त्याला आग लावली व विषारी औषध प्राशन करीत त्यावर झोपला व बेशुद्धावस्थेतच जाळल्या गेला असावा, असा अंदाज काढण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार, बालाजी फलटणकर, राजू घोलप, राजू खार्डे, समाधान गीते आदि करीत आहेत.

स्वतःच्या हाताने स्वतःच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांची दैनावस्था व त्यातून आलेला घुसमटलेपणा चव्हाट्यावर आला आहे. तर विविध माध्यमातून सर्वत्र घटना पोहोचल्याने चिंतायुक्त हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: young farmer suicide sindkhedraja