युवा शेतकऱ्याची कमाल... अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पन्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

वडिलांकडे पाच एकर शेती होती. ते तिथे पारंपरिक पीक घेत होते. पण नेहमी शेती नुकसानीतच जायची. अशावेळी आपल्या घरी स्क्रीन प्रिटींगचा लहानसा व्यवसाय करणाऱ्या गणेशने शेतीची धुरा आपल्या हाती घेतली.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : वडील करीत असलेल्या पाच एकर शेतीतील पारंपरिक पिकातून नेहमीच नुकसानच व्हायचे. अशावेळी स्क्रीन प्रिटींगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने शेतीची धुरा आपल्या हातात घेतली. अर्धा एकर शेतात त्याने वांग्याचे उत्पादन घेतले. प्रभावी नियोजन आणि मेहनत करीत त्याने यातून लाखो रुपयांचे उत्पन्न कमवित आर्थिक यशाचे गणित साधले. पोंभुर्णा तालुक्‍यातील चेकबल्लारपूर येथील गणेश बट्टे या तरुण शेतकऱ्याने यातून परत शेतीकडे वळण्याचा संदेश दिला. 

गणेशने घेतली शेतीची धुरा हाती

वडिलांकडे पाच एकर शेती होती. ते तिथे पारंपरिक पीक घेत होते. पण नेहमी शेती नुकसानीतच जायची. अशावेळी आपल्या घरी स्क्रीन प्रिटींगचा लहानसा व्यवसाय करणाऱ्या गणेशने शेतीची धुरा आपल्या हाती घेतली. पाच एकर शेतापैकी दोन एकर शेतात त्याने धान लावले, तर अडीच एकर शेतात कपाशी केली. अन्‌ उरलेल्या अर्धा एकरात वांग्याचे उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या एकर शेतात साधारणः हजार ते बाराशे वांग्यांचे बुड लावले. आपल्या घरी असलेल्या पाळीव प्राण्यांच्या शेणातून गणेशने जवळपास तीन ट्रॅक्‍टर सेंद्रिय खत निर्माण केले. या खताचा वापर वांग्याच्या रोपावर केला. दीड महिन्यातच वांग्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होऊ लागले. 

अवश्‍य वाचा : विवाह सोहळ्यातून "त्या' शेतकरी कुटुंबांना मिळाला आधार 

सहापट अधिक उत्पन्न केवळ अर्ध्या एकरात

अर्धा एकर जागेत गणेशने आतापर्यंत तब्बल अडीच लाख रुपयांचे उत्पन्न कमविले आहे. येणाऱ्या दिवसांत वांगे मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने पुन्हा अडीच लाख रुपये फायदा होईल, असा त्याचा अंदाज आहे. शेतात वांगे मोठ्या प्रमाणावर असताना पिकाला योग्य भाव मिळविण्यासाठी गणेश गडचिरोली, सावली, मूल, व्याहाड, गोंडपिपरी, पोंभुर्णा लगतच्या बाजारात वांग्याची ठोक स्वरूपात विक्री करीत आहे. साडेचार एकर जागेत पारंपरिक पीक घेऊन जितकं उत्पन्न गणेशला मिळाले, त्यापेक्षा सहापट अधिक उत्पन्न केवळ अर्ध्या एकरातील वांग्याने मिळवून दिले. येणाऱ्या दिवसांत बाजारभाव लक्षात घेता टोमॅटोचे उत्पन्न घेणार असल्याचे गणेशने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

अर्धा एकरात साधारणपणे एक हजार बुडाच्या जोरावर मला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविता आले. अर्थातच मीकेलेल्या प्रचंड परिश्रमाचे हे फळ आहे. युवकांनी पीक घेताना टायमिंग साधणे महत्त्वाचे आहे. 
- गणेश बट्टे, 
युवा शेतकरी चेकबल्लारपूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young farmer's miracle ... In Half an acre took millions rs crop