पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन युवतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

अमरावती : कॅम्प परिसरातील नेक्‍स्ट लेव्हल मॉलच्या पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन युवतीने शनिवारी (ता. पाच) सकाळी पावणेअकराच्या सुमारास आत्महत्या केली. रूपाली सुरेश बुंधाडे (वय 24, रा. शिराळा), असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे.

अमरावती : कॅम्प परिसरातील नेक्‍स्ट लेव्हल मॉलच्या पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन युवतीने शनिवारी (ता. पाच) सकाळी पावणेअकराच्या सुमारास आत्महत्या केली. रूपाली सुरेश बुंधाडे (वय 24, रा. शिराळा), असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे.
रूपालीने काही वर्षांपूर्वी शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर तिने अमरावतीच्या दुसऱ्या एका महाविद्यालयात एमबीएसाठी प्रवेश घेऊन परीक्षाही दिली. वर्षभरापासून ती दररोज शिराळा ते अमरावती येणे-जाणे करीत होती. एमबीएच्या परीक्षेत ती काही विषयांत अनुत्तीर्ण झाली. अभियांत्रिकीला असताना ती काही विषयात अनुत्तीर्ण झाली होती, असे नातेवाइकांनी सांगितले. रूपाली शुक्रवारी (ता. चार) दुपारी बाराच्या सुमारास महाविद्यालयात कार्यक्रम असल्याचे सांगून शिराळा येथून अमरावतीत आली. घरून निघण्यापूर्वी तिने शुक्रवारी रात्री मैत्रिणीकडे मुक्काम करून शनिवारी (ता. पाच) दुपारपर्यंत गावी शिराळा येथे परत येईल, असे तिने पालकांना सांगितले होते. नेक्‍स्ट लेव्हल मॉल हे सार्वजनिक व्यापारसंकुल आहे. सर्वांत वरच्या माळ्यावर बार ऍण्ड रेस्टॉरंट चालते. त्यामुळे दिवसभर येथे नागरिकांची गर्दी असते. रूपाली शनिवारी (ता. पाच) सकाळी 10 वाजून 42 मिनिटांनी या मॉलच्या परिसरात आली. त्यानंतर दुसऱ्यांदा मॉलच्या एका बाजूने असलेल्या पायऱ्यांनी पाचव्या माळ्यावर पोहोचली. परंतु, पावणेअकराच्या सुमारास रूपालीने थेट पाचव्या माळ्यावरून खाली उडी घेतली. डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने मॉलच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने तिला एका ऑटोत टाकून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
नकारार्थी विचारांनी तिला संपविले
रूपालीने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात मनात सतत आत्महत्येचे विचार येत असल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे नमूद आहे, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young woman commits suicide by jumping from the fifth floor