उपराजधानीतील तरुणांचा अनोखा उपक्रम

File photo
File photo

नागपूर : "सॅनिटरी नॅपकिन'विषयी घरात कधीही मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी आलेल्या अक्षय कुमारच्या "पॅडमॅन' चित्रपटामुळे महिलाच नव्हे, तर पुरुष मंडळीही आता व्यक्‍त होऊ लागले आहेत. नागपूरच्या काही तरुण मंडळींनी जागोजागी "सॅनिटरी नॅपकिन्स'च्या विक्रीचा अनोखा उपक्रम राबवून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. अनिकेत कुतरमारे, मेघा वानखेडे, उर्वशी फुलझेले, शीतल गडलिंग व नीलेश बागडे हे ते तरुण असून, त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. यासंदर्भात "सकाळ'ने त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
"सॅनिटरी नॅपकिन'विषयी जनजागृतीची कल्पना कशी सुचली?
महिलांच्या मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या "सॅनिटरी नॅपकिन'विषयी मनमोकळेपणाने बोलले जात नाही. महिलांच्या आरोग्याशी निगडित हा विषय असल्यामुळे कसलीही लाज न बाळगता त्याची चर्चा होणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात समाजातही अनेक गैरसमज आहेत. याकडे स्त्रीच्या हक्काच्या व गरजेच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. स्त्रीने निरोगी आयुष्य जगावे, लोकांची मानसिकता बदलविणे, हाच आमचा मुख्य हेतू आहे. अक्षय कुमारच्या "पॅडमॅन' या चित्रपटामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळाली.
या उपक्रमाद्वारे किती महिलांना मदत केली?
धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपुरात हजारो तरुणी व महिला आल्या होत्या. त्यांना एकाच दिवशी आम्ही पाच हजार "सॅनिटरी पॅडचे' वाटप केले. तसेच इतरही शहरांमध्ये विविध औचित्य साधून पॅडचे वाटप केले जाणार आहे.
यादरम्यान तुम्हाला आलेले अनुभव?
नॅपकिनचे वाटप करताना अनेक तरुणी ते घ्यायला भीत होत्या. अनेक प्रश्‍न विचारत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारची भीती दिसत होती. स्त्रियांनी मासिकपाळीच्या दिवसांत स्वच्छता राखून आपल्या आरोग्याची स्वत:च काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे आम्ही त्यांना पटवून दिले. त्यासाठी "सॅनिटरी पॅड'चा वापर औषधाप्रमाणेच गरज असल्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहायला हवे. पॅड वापरल्याने इन्फेक्‍शन व अन्य आजारांपासून रक्षण होऊ शकते. याशिवाय पॅडची विल्हेवाट करण्यासंदर्भातही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सर्वसामान्यांचा प्रतिसाद कसा आहे?
आम्ही ही कल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवित आहे. त्यांच्याकडून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचा उपक्रम सर्वांनाच आवडतो आहे. काहींनी आर्थिक मदतदेखील केली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे साहजिकच आमचाही आत्मविश्‍वास वाढतो आहे.
भविष्यातील योजना कोणत्या?
आमचा उपक्रम नागपूरपुरताच मर्यादित नाही. त्याचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर करायचा आहे.प्रत्येक राज्यातील महिला व किशोरवयीन मुलींनी "सॅनिटरी पॅड' वापरावे म्हणून आमचा आग्रह आहे. पुढच्या टप्प्यात आम्ही मुंबई गाठणार आहोत. तेथील तरुणी व महिलांना नऊ हजार पॅडचे वाटप करण्याचा आमचा संकल्प आहे.
युवापिढीला कोणता सल्ला द्याल?
आजची युवापिढी देशाचे भविष्य आहे. देशातील प्रत्येक स्त्री ही निरोगी राहावी, याकरिता प्रत्येक तरुणाने कार्यशील असायला हवे. आम्ही पंधरा तरुण-तरुणींनी सुरू केलेल्या या उपक्रमाला समाजाचीही साथ हवी आहे. स्त्रियांना "ओव्हरी कॅन्सर' व अन्य आजारांपासून मुक्त करण्यासाठी आमच्या कार्यास त्यांच्या मदतीची आवश्‍यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com