दृष्टिहीन वृद्ध महिलासह तिच्या नातीला दिला युवकांनी आधार...बांधून दिले घराचे छप्पर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

13 वर्षीय अंजना कोणतेही शिक्षण घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. आई, वडिलांच्या मायेपासून पारख्या झालेल्या अंजनाला वृद्ध आणि अंध असलेली आजीसुद्धा मदत करून शकत नाही. तिलासुद्धा सांभाळावे लागणार आहे. अशा परिस्थितीत ती शिक्षणाचा विचार तरी कसा करू शकेल.

चामोर्शी (जि. गडचिरोली) : नाव तारा असले; तरी तिच्या नयनांची ज्योती आधीच विझलेली. वृद्धत्वासह अंधत्व कमी की काय म्हणून तिच्या मुलीने आपल्या लेकीला तिच्या पदरात टाकून या जगाचा निरोप घेतला. मग, तिच्या इवल्याशा नातीनेच मोठेपणा स्वीकारत आजीचा सांभाळ सुरू केला. मात्र, या गरिबांचे हे सुखही नियतीला बघविले नाही आणि यंदाच्या पावसाळ्यात त्यांचे राहते घर कोसळले.

 

सारेच आधार असले गमावले असताना चामोर्शीतील काही युवकांना आजी, नातीच्या आर्त हाकेने गहिवर आणला आणि हे युवक त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळे आता वृद्ध ताराबाई व तिच्या नातीच्या डोक्‍यावरील छप्पर पुन्हा साकारले गेले आहे.

ही कथा आहे वृद्ध आणि अंध असलेली ताराबाई अर्के व तिची 13 वर्षांची नात अंजना हिची. शिवाजी हायस्कूलच्या मागे असलेल्या ढोरफोडीतील जागेत गीताबाई रामू कुमरे, तिची आंधळी असलेली वृद्ध आई ताराबाई अर्के व 13 वर्षांची मुलगी अंजना रामू कुमरे राहायचे. या गरीब कुटंबाला पुरुषाचा आधार नसताना गीता कुमरेने मोलमजुरी करून आपल्या आंधळ्या आईला व 13 वर्षांच्या मुलीला सांभाळले होते. गरिबीत का होईना हे तीन जीव आणि त्यांचे घर तग धरून होते.

असं घडलंच कसं : धक्कादायक! राज्यपालांच्या दत्तक तालुक्‍यातील तीन गावे सहा महिन्यांपासून अंधारात

पावसात झोपडीच कोसळली

पण, लॉकडाउनच्या काळात गीता कुमरेचा आजाराने मृत्यू झाला. या कुटुंबातील कमावती महिला गेल्याने वृद्ध ताराबाई व अंजनाचा आधार हिरावला गेला. घरी कमावणारे कोणी नाही व त्यात अंध आजीची जबाबदारी. तरीही अंजना खंबीरपणे जगत होते.पण, यंदा पावसात या दोघी राहत असलेली झोपडीच कोसळली. एका पाठोपाठ एक अशी संकटे कोसळल्याने या दोघी हवालदिल झाल्या होत्या. त्यांच्या समस्यांची माहिती चामोर्शीतील अजिंक्‍य रमेश चकोर, अंकुश सुरेश गोयल, नीरज रवींद्र एग्लोपावार व हरमनप्रीत या युवकांना मिळाली.

युवकांनी केली निवाऱ्याची सोय

या युवकांनी एकत्र येत 25 हजार रुपये जमा केले. या पैशांतून त्यांनी या दोघींना सिमेंटच्या पत्र्याचे छप्पर असलेले घर बांधून दिले. तसेच जीवनावश्‍यक वस्तू, मच्छरदाणी, पलंग, गादी आदी साहित्यसुद्धा दिले. यासाठी हेल्पिंग हॅण्ड्‌स या संस्थेची मदत मिळाल्याची माहिती अजिंक्‍य चकोर यांनी दिली.

जाणून घ्या : चकमकीत ठार झालेला जहाल नक्षली शंकरवर होते एवढे बक्षीस

उत्पन्नाचा, शिक्षणाचा प्रश्‍न

सध्या या दोघींच्या डोक्‍यावर छप्पर आले असले, तरी या दोघींच्या उत्पन्नाचा व अजंनाच्या शिक्षणाचा प्रश्‍न शिल्लक आहे. 13 वर्षीय अंजना कोणतेही शिक्षण घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. आई, वडिलांच्या मायेपासून पारख्या झालेल्या अंजनाला वृद्ध आणि अंध असलेली आजीसुद्धा मदत करून शकत नाही. तिलासुद्धा सांभाळावे लागणार आहे. अशा परिस्थितीत ती शिक्षणाचा विचार तरी कसा करू शकेल. म्हणून समाजातील सुहृदयी व्यक्तींनी पुढाकार घेत या दोघींना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth provided support to the shelter of blind Tarabai