esakal | त्या बॅगमुळे अख्खे गाव संकटात! बँगचा मालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

quartine center

मुंबई येथून आलेला तरूण काही मिनिटांसाठी बॅग ठेवण्याच्या निमित्ताने घरी गेला होता. मात्र, त्याच्या जाण्याने आता अख्खे गाव कोरोनाच्या संकटात सापडले आहे.

त्या बॅगमुळे अख्खे गाव संकटात! बँगचा मालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
नंदकिशोर वैरागडे

कोरची ( जि.गडचिरोली ) : मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. आजवर निघालेल्या 26 कोरोनाबाधित रुग्णांपैकी पैकी 25 बाधित एकट्या मुंबईहून आले आहेत. त्यामुळे मुंबई शब्द उच्चारताच नागरिकांच्या मनात धडकी भरते.
असाच प्रकार कोरची तालुक्‍यातील कोहका या गावात घडला. येथे मुंबई येथून आलेला तरूण काही मिनिटांसाठी बॅग ठेवण्याच्या निमित्ताने घरी गेला होता. मात्र, त्याच्या जाण्याने आता अख्खे गाव कोरोनाच्या संकटात सापडले आहे.
देशभरात कोराेना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन तसेच प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. बाहेर जिल्ह्यातून किंवा रेड झोनमधून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. गेल्या 14 मेला मुंबई येथून एक युवक कोरची तालुक्‍यातील कोहका या गावी जाण्यासाठी कोरची येथे पोहोचला. त्याला लागलीच कर्मचाऱ्यांनी क्वारंटाईन कक्षात हलविले. मात्र, दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तो आपल्या कुटूंबाच्या भेटीसाठी गावी गेला. कपडे व सामानाची बॅग घरी ठेवून काही वेळात निघाला खरा पण, तेथील अंगणवाडी मदतनीसच्या लक्षात येताच तिने त्याला गावातील शाळेत क्वारंटाईन केले. तीन दिवसानंतर प्रशासनाने त्याची रवानगी थेट जिल्हा मुख्यालयातील क्वारंटाईन कक्षात केली. त्यानंतर सात दिवसांनी "त्या" युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला आणि प्रशासनाची एकच धावपळ सुरू झाली.
मुंबई येथून तो थेट कोरची येथेच आला, गावी गेला नसल्याची खोटी माहिती तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिली होती. मात्र. कोरोना बाधित युवकाने दिलेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाने लागलीच कोहका गाव प्रतिबंधित झोन म्हणून घोषित केले. प्रशासनाचा आदेश गावात धडकताच ग्रामस्थांमध्ये चांगलीच धडकी भरली.

सविस्तर वाचा - सामूहिक चाचणीचा निर्णय राज्याने घ्यावा

500 लोकसंख्येचे नक्षलग्रस्त कोहका गाव आता कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्याने येथील ग्रामस्थांना आता 14 दिवस बंदिस्त राहावे लागणार आहे. मुंबईत कामासाठी गेलेल्या युवकाच्या बॅगने अख्ख्या गावाला चिंतेत टाकले असून तो किती लोकांच्या संपर्कातआला, याचा शोध आता प्रशासन घेत आहे.