मंदुरा येथे युवकाचा मध्यरात्री निर्घृण खून

मंदुरा येथे युवकाचा मध्यरात्री निर्घृण खून

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदुरा या गावी काल मध्यरात्रीनंतर शुभम देवानंद तेलमोरे या 22 वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाला. छेडछाडीतून हा खून झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन तासातच आरोपीचा छडा लावण्यात माना पोलीसांना यश मिळाले आहे.

मुंबई-हावडा लोहमार्गावर मंदुरा या छोट्याशा गावात हा थरार घडला. रामा वासुदेव चौके यांच्या घराच्या पायरीवर शुभम देवानंद तेलमोरे (22) चा मृतदेह उपडा पडलेला दिसला. त्याच्या शरीरावर चाकूचे वार हाेते. रामा घरात गाढ झोपेत जवळपास बेशुध्दावस्थेत होता. त्याच्या 15 वर्षे वयाची मुलगी आणि 10 वर्षे वयाच्या मुलांची पाेलिसांनी चाैकशी केली. मुलीने सांगितले की, दार उघडल्यानंतर आम्हाला हा मरून पडलेला व एक काळ्या कपड्यातील मनुष्य पळून जातांना दिसला.

तासाभराच्या चौकशीत अशीच माहिती ते सांगत राहिले. त्यामुळे पोलीस पाटलाच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविच्या 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासचक्रे फिरली
मुलीच्या सांगण्यात बनावटीचा संशय येताच ठाणेदार भाऊराव घुगे कामाला लागले. तीन मुले बारा वाजता रस्त्यावर दिसल्याची माहिती काही ग्रामस्थांकडून मिळाली. यावरुन पुण्यात कामाला असलेल्या मंदुऱ्यातील रवि गौतम तेलमोरे व विकी मनोहर श्रीवास या दोघांना उचलले. लपून छपून दारू विकणाऱ्या रामा चौके याचेकडून रात्री दारू आणून शुभमसह तिघांनी मद्यप्राशन केले होते. तिघांपैकी एकजण पुण्याला जाणार म्हणून तिघांनी पार्टी केली. बारा वाजता शुभम एकटाच रामाच्या घरी गेला. काही वेळाने तिसऱ्यांदा गेला अन् घात झाला.

छेडछाडीतून खून
दोघा मित्रांनी कबुलीनंतर ठाणेदार घुगे यांनी मुलीची उलटतपासणी केली. यावेळी ती बोलली. तिसऱ्यांदा आलेल्या शुभमने आपला हात पकडला. लगेच आपण वडीलांना उठविले. त्यांनी शुभमच्या छातीवर मानेवर चाकूने सपासप वार केले. मद्यधुंदावस्थेतील शुभम गातप्राण झाला. आपल्या बापानेच खून केल्याची अशी कबुली मुलीने दिली.

आराेपी रुग्णालयात
बेशुद्धावस्थेतील आरोपी रामा चौके रुग्णालयात दाखल आहे. त्याचा रक्तदाब खूपच कमी झाल्यामुळे त्याला अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे वृत्त लिहीपर्यंत गुन्हा अज्ञात आरोपीविरूद्धच दाखल होता.

दाेन तासात छडा
पोलीस पाटलांनी ठाणेदार घुगे यांना रात्री दोन वाजता भ्रमणदूरध्वनीवरून या प्रकाराची माहिती दिली. उपनिरिक्षक चंदु पाटील, नलावडे, कथलकर, टिकार, सचिन दुबे, राजेश वायधने, वाकोडे, तायडे यांचा ताफा घेऊन भाऊराव घुगे यांनी सव्वातीनला घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, येथील शहर ठाणेदार दत्तात्रय अव्हाळे व ग्रामीणचे ठाणेदार नितिन पाटील यांनीही तपासातील मदतीसाठी रात्रीच घटनास्थळ गाठले होते. कुलदीप ठाकूर यांच्या नेतृत्वातील अमरावतीचे आयकार (श्वानासह शास्त्रोक्त तपास करणारे पथक) पथकही घटनास्थळी पोचले होते.

तपासकामात झोकून द्यायचं, हा विश्वास स्वतःमध्ये विकसित करीत आलोय. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास दोन तासात लागला. चालढकल केली असती, तर हाती काहीच लागू शकले नसते. कमी वयात तरुणांचे दारूच्या आहारी जाणे अंतर्मुख करणारे आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर व उप विभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. - भाऊराव घुगे, ठाणेदार, पो.स्टे.माना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com