
मनी असेल मानवसेवेचा भाव तर रक्तदानासारखा दुसरा नाही उपाय, ही म्हण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह कर्मचारी संघटनांनी कृतीत उतरवून दाखविली आहे. कोरोना विषाणू विरोधात लढा देत असताना जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘चला आपण सगळेजण रक्तदान करू’ असे म्हणत आपत्तीच्या या काळात गरजूंसाठी रक्तदानाचे महान काम केले आहे. त्यामुळे 135 बॉटल रक्त संकलन सुद्धा झाले. या रक्तातून अनेकांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना मदत होणार आहे.
अकोला ः मनी असेल मानवसेवेचा भाव तर रक्तदानासारखा दुसरा नाही उपाय, ही म्हण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह कर्मचारी संघटनांनी कृतीत उतरवून दाखविली आहे. कोरोना विषाणू विरोधात लढा देत असताना जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘चला आपण सगळेजण रक्तदान करू’ असे म्हणत आपत्तीच्या या काळात गरजूंसाठी रक्तदानाचे महान काम केले आहे. त्यामुळे 135 बॉटल रक्त संकलन सुद्धा झाले. या रक्तातून अनेकांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना मदत होणार आहे.
सध्या सर्वत्र संसर्गजन्य कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या नेतृत्वात व शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नियोजनात शुक्रवारी (ता. 18) जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात शिक्षक संघटना व कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रथम टप्प्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी राहुल शेळके, मदनसिंह बहुरे यांचेसह 135 जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. कोरोना संसर्गापासून नागरिकांनी घाबरु नये, जागरुक रहावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षण सभापती पांडे गुरुजी यांनी यावेळी केले.
सोशल डिस्टेन्सिंगचे पालन
रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचे व नियमांचे काटेकोर पालन केले. प्रमुख अतिथींद्वारे रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायजर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व रक्तदात्यांना टप्प्या-टप्प्याने शिबिर स्थळी बोलावण्यात आले होते. मास्क घालून येणे अनिवार्य करण्यात आले होते. सोशल डिस्टन्स राखण्याची काळजी आयोजकांकडून घेण्यात आली होती.
शिबिरासाठी यांचे मोलाचे सहकार्य
रक्तदान शिबिराचे आयोजन सुनील जानोरकर (म.रा. सरचिटणीस जिल्हा परिषद कर्मचारी युनियन), प्रकाश चतरकर (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद), शशिकांत गायकवाड (कास्ट्राईब शिक्षक संघटना), देवानंद मोरे (महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना), रजनिश ठाकरे (अखिल भारतीय शिक्षक संघ), ज्ञानेश्वर मांडेकर (सानेगुरुजी सेवा संघ), शंकर डाबेराव (शिक्षक प्रतिनिधी सभा), मारुती वरोकार (महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती), जव्वाद हुसेन (उर्दू शिक्षक संघटना), संजय बर्डे (दिव्यांग शिक्षक संघटना), संजय भाकरे व विजय भोरे (महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ), मेश्राम (बहुजन शिक्षक संघटना), विलास मोरे (स्वाभिमानी शिक्षक संघटना), मंगेश दसोडे (शिक्षक आघाडी), एक्शन फोर्स, पुंडलिक भदे, प्रहार संघटना, रशीद अहमद, अरुण धांडे (शिक्षक परिषद) यांनी आयोजन केले होते.