‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून राज्यात ‘जलसेना’

pani foundation
pani foundation

मुख्यमंत्री : वॉटर कपसाठी ३० तालुक्‍यांची घोषणा 

मुंबई - सिनेअभिनेता अामीर खान यांच्या पुढाकाराने दुष्काळमुक्‍त महाराष्ट्रासाठी राज्यात ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेली ‘वॉटर कप स्पर्धा’ लोकचळवळ होत असून, यामधूनच राज्यात ‘जलसेना’ उभी राहत आहे. ही जलसेनाच आगामी काळात महाराष्ट्राला दुष्काळमुक्‍त करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 3) व्यक्‍त केला. 

सह्याद्री अतिथीगृह येथे वॉटर कप स्पर्धा-२०१७ ची घोषणा करण्यात आली. या वेळी १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्‍यांची घोषणा करण्यात आली. पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा अामीर खान, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पोपटराव पवार, किरण राव यांच्यासह टाटा, रिलायन्स, पिरामल, पारेख या उद्योग समूहाचे अधिकारी, संगीतकार अजय अतुल, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते. 

सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवारदेखील या वेळी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की आजपर्यंत पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेला लोकचळवळीचे स्वरूप दिले नसल्याने ती अपयशी झाली. आगामी काळात या चळवळीतूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्‍त होईल. 

दंगल या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर जेवढा आनंदा झाला त्यापेक्षा अधिक आनंद या वर्षीच्या तीस तालुक्‍यांतल्या कामांना यश मिळाले तर होईल, अशी भावना अामीर खान यांनी व्यक्‍त केली, तर शिस्त व शास्त्रावर विश्वास ठेवून पाणी फाउंडेशन राज्यात काम करत असल्याचे डॉ. पोळ म्हणाले. 

निवडलेले ३० तालुके 
स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१७ आहे. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१७ असा आहे. स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ५० लाख, दुसरे बक्षीस 30 लाख, तर तिसरे बक्षीस 20 लाख रुपये आहे. 


या स्पर्धेसाठी अंबाजोगाई, केज, धारुर, जि. बीड, औसा, निलंगा, जि. लातूर, भूम, परंडा, कळंब, जि. उस्मानाबाद, फुलंब्री, खुलताबाद, जि. औरंगाबाद, कोरेगाव, माण, खटाव, जि. सातारा, पुरंदर, इंदापूर, जि. पुणे, खानापूर, आटपाडी, जत, जि. सांगली, सांगोला, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, बार्शी-टाकळी, पातूर, अकोट, जि. अकोला, कारंजा, जि. वाशीम, राळेगाव, कळंब, उमरखेड, जि. यवतमाळ, आर्वी, जि. वर्धा, वरुड, धारणी, जि. अमरावती या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. 

सकाळ माध्यम समूहाच्या कार्याचे कौतुक 
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. राज्यभरात सकाळ समूह जलसंधारणच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याचे ते म्हणाले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का’ या महिलांच्या संघठनाने पाण्याच्या क्षेत्रात राज्यभरात मोठे काम उभारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com