Manja
Manja

मांजा महाग...माणसाचा जीव स्वस्त...

पतंगाच्या मांजानं गळा कापला जाऊन ऑफिसमधल्या सहकाऱयाचा बळी गेलाय. तीन रात्री हॉस्पिटलमध्ये तडफडत तिचा मृत्यूशी चाललेला संघर्ष आज पहाटे कधीतरी कायमचा संपलाय. माणसाच्या जगण्याची किंमत पतंगाच्या मांजापेक्षा स्वस्त आहे, हे जाता जाता हा मृत्यू सांगून गेलाय.

पुण्यातल्या भर गर्दीच्या शनिवारवाड्यासमोरच्या रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये तिचा गळा कापला गेला. कुठून तरी कटलेला पतंग आला आणि लोंबणाऱया मांजानं तिचा गळा खोलवर कापला गेला. हसऱया सुवर्णाला काही क्षण कळलंही नसेल, की नेमकं होतंय काय आपल्याला...शंभर मीटरवरच्या सुर्या हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत मृत्यूचा विचार तिच्या डोक्यात कदाचित डोकावलाही नसेल.

मांजानं गळ्यातल्या शिरा, श्वासनलिकेपासून ते मेंदूला रक्तपुरवठा करणाऱया रक्तवाहिन्यांपर्यंत सारा भाग कापला. पतंग कुणाचा, संध्याकाळी भर गर्दीच्या वेळी तो कटून शनिवारवाड्यासमोरच्या भागात आला कुठून, बंदी असलेला नायलॉन दोऱयाचा मांजा वापरला कुणी असल्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील, असं वाटत नाही. मिळाली तरी जीव परत आणणारी नाहीत.

आज सहकारी मांज्यानं गेली, म्हणून मांजा डोळ्यासमोर सलतोय. बंदी घातलेल्या मांजाची राजरोस विक्री होतेय, म्हणून ती गेली ही भावना अस्वस्थ करतेय. 'पतंग ही संस्कृती आहे आणि मी पतंग उडवणारच' म्हणत नायलॉनचा चीनी मांजाला कळत नकळत प्रोत्साहन देणाऱयांना तडफडणारी सहकारी आणि रक्तानं माखलेले तिचे कपडे दाखवावेसे वाटताहेत.

पतंगाच्या या विकृत, भीषण प्रकाराविरुद्ध एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. आज रस्त्यावर बाईकवरून जाताना कुणाचा तरी गळा मांज्यानं कापलाय. उद्या हा मांजा घरात शिरून गळे कापायला लागेल... हा उद्या नको असेल, तर या मांज्याची विक्री करणारी दुकानं शोधून पोलिसांना कळवायला हवीत. हा मांजा वापरणाऱयांना परिणामांची जाणिव करून द्यायला हवी. 12 जुलै 2017 ला हरित न्यायालयानं या मांज्यावर बंदी घातलीय...तरीही मांज्या खपणार असेल आणि विकत घेणारे असतील आणि आपण पाहणारेच असू तर मग मांजापेक्षा आपला जीव स्वस्त करून टाकायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com