कर्नाटकातील पाच ऐतिहासिक गोमटेश

संजय उपाध्ये
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

श्रवणबेळगोळ येथील बाहुबली मूर्तीच्या निर्मितीनंतर त्यांच्या आकर्षणातून देशभरात ठिकठिकाणी मूर्ती कोरण्याचे प्रयत्न झाले आहेत. एकट्या कर्नाटकातच पाच-सहा ठिकाणी भव्य मूर्ती आहेत.

श्रवणबेळगोळच्या बाहुबली मूर्तीची निर्मिती हा भारतीय शिल्प आणि वास्तुकलेतील एक मैलाचा दगड ठरला आहे. याच्यानंतर मूर्तीची उभारणी आणि भव्यदिव्य मंदिरे बांधण्याची परंपरा सुरू झाली. कर्नाटकातील गंग, होयसळ, राष्ट्रकूट या राजवटीत एकाच पाषाणातून अखंड बाहुबलीची मूर्ती निर्माणची परंपरा सुरू झाली. त्यातूनच कर्नाटकातील पाच ठिकाणी अशा मूर्ती उभ्या राहिल्या.

या सर्व मूर्तींवर श्रवणबेळगोळच्या मूर्तीचा फार मोठा प्रभाव राहिला आहे. हुबेहूब तशीच प्रतिमा निर्माण करायचाही प्रयत्न झाला आहे.

ऐतिहासिक गोमटेश - 
कारकळ -

कारकळ (जि. उडुपी) येथे ४२ फूट उंच बाहुबलींची मूर्ती आहे. ती पंधराव्या शतकातील आहे. मूर्तीच्या मुखावरील स्मित मनाचा ठाव घेते. कळसा-कारकळचे राजे वीरपांड्या यांनी ही मूर्ती इ. स. १३ फेब्रुवारी १४३२ ला उभारली. ही मूर्तीही कायोत्सर्ग स्वरूपात उभी आहे. २००२ ला तेथे महामस्तकाभिषेक झाला.

वेणूर -
बेळतंगडी (जि. मंगळूर) तालुक्‍यातील वेणूर येथे ही मूर्ती आहे. ही मूर्ती सोळाव्या शतकातील आहे. या मूर्तीची उंची ३८ फूट आहे. राजे वीर तिम्माण्णा अजिला यांनी १६०४ ला ही मूर्ती कोरून घेतली. अजिला हे चामुंडराय यांचे वंशज असल्याचे सांगितले जाते.

गोम्मटगिरी -
म्हैसूर जिल्ह्यातील हुणसूर तालुक्‍यातील गोम्मटगिरी येथे ही मूर्ती आहे. ही मूर्ती वीस फूट उंचीची आहे. विशेष म्हणजे या मूर्तीवर दरवर्षी महामस्तकाभिषेक केला जातो. येथील छोट्याशा डोंगरावर ही देखणी मूर्ती आहे. येथे जलमंदिर आणि २४ तीर्थंकराच्या पादुका आहेत. ही मूर्ती ७०० वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते.

धर्मस्थळ -
ही मूर्ती अलीकडील म्हणजे २० व्या शतकात उभी केली आहे. धर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. वीरेंद्रकुमार हेगडे यांनी ही मूर्ती १९७३ च्या दरम्यान उभी केली. याचे शिल्पकार गोपाळ रंजन शेणई (कारकळ) हे आहेत. मूर्तीची उंची तब्बल ३९ फूट इतकी आहे.

कुंभोज येथील बाहुबली - 
कुंभोज (ता. हातकणंगले) येथे प. पू. समंतभद्र महाराज यांच्या प्रेरणेने १९६३ साली बाहुबली मूर्तीची स्थापना झाली. ती २८ फूट उंच आहे.

स्टॅच्यू ऑफ अहिंसा  
नाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगी या डोंगरावर ही मूर्ती कोरली आहे. २१ व्या शतकातील ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीची उंची १०८ फूट इतकी आहे आणि बाहुबलीची ती जगातील सर्वांत उंच मूर्ती ठरली आहे. आर्यिका ज्ञानमती माताजी यांनी ही मूर्ती कोरवून घेतली. त्याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.

Web Title: Sanjay Upadya article on Shravanabelagola Mahamastakabhisheka