त्याग आणि शांतीची एकमेवाद्वितीय महामूर्ती

त्याग आणि शांतीची एकमेवाद्वितीय महामूर्ती

विंध्यगिरी म्हणजे इंद्रगिरी होय. कन्नडमध्ये ‘दोड्डबेट्ट’ (मोठा डोंगर) असे म्हटले जाते. चंद्रगिरीवर मोठा इतिहास घडत असताना विंध्यगिरी डोंगर मात्र निश्‍चिल उभा होता. प्रधानमंत्री चामुंडराय यांनी या डोंगरावर बाहुबलींची मूर्ती कोरून घेतली आणि तेथूनच इतिहास सुरू झाला.

जैन धर्मानुसार पहिले तीर्थंकर भगवान वृषभनाथ किंवा आदिनाथ होत. त्यांना दोन राण्या होत्या. मोठी राणी यशस्वती. यांच्यापासून वृषभदेवांना भरत आणि इतर पुत्र तसेच ब्राह्मी नावाची पुत्री होती. तर दुसरी राणी सुनंदा. यांच्यापासून पुत्र बाहुबली आणि पुत्री सुंदरी होत. राज्यासाठी मोठे पुत्र भरत आणि बाहुबली यांच्यात युद्ध झाले. बाहुबलींनी आपल्या बाहुबलावर भरत यांचा सर्वच बाबतींत पराभव केला, पण मोठ्या भावाचा पराभव त्यांना जिव्हारी लागला. त्यांना वैराग्य प्राप्त झाले. राज्य सोडून ते तपश्‍चर्येसाठी निघून गेले.

हे आहेत विंध्यगिरीवरील आकर्षण

  •  दगडातून कोरलेली सुंदर ओडेगल बसदी

  •  मूर्तीजवळ यक्षिणी कुष्मांडिनी 

  •  कलश घेतलेल्या गुल्लिकायजी 

  •  त्यागद ब्रम्हदेवाचा स्तंभ

इकडे भरताने पोदनपुरात बाहुबलीची मोठी मूर्ती उभी केली. हीच कथा आपल्या आईकडून चामुंडराय यांनी ऐकली होती आणि त्यानंतर मातेच्या इच्छेनुसार त्यांनी बाहुबलीची ही ऐतिहासिक मूर्ती कोरून घेतली. अखंड शिलेतून बाहुबलींची सुंदर आणि नाजूक मूर्ती कोरली आहे. मूर्ती अतिशय प्रमाणबद्ध आहे. मुखावर लहान बालकासारखे निरागस भाव आहेत. डोक्‍यावर सुंदर कुरळे केस आहेत. उघडे डोळे अनंताचा वेध घेत आहे. नाजूक ओठांच्या कोपऱ्यातून स्मित उमटले आहे. खांदे रुंद आणि भक्कम आहेत. हात सरळ खाली आले आहेत. कायोत्सर्ग स्वरूपात ही मूर्ती असून फुललेल्या कमळात भगवान तपसाधनेत लीन आहेत.

याबरोबरच या विंध्यगिरी डोंगरावर इतर ऐतिहासिक वास्तू आहेत.

ओडेगल बस्ती (जैन मंदिर) - 
याचा अर्थ या बसदीला आधारासाठी वापरलेल्या दगडामुळे हे नाव मिळाले. याचे खरे नाव ‘त्रिकुटाचल बसदी’ असे आहे. बसदीचे बांधकाम अतिशय सुंदर आहे.

कुष्मांडिनी यक्षिणी - 
या यक्षिणीने चामुंडराय आणि त्यांची माता काललादेवी यांना एकाचवेळी स्वप्नात येऊन बाहुबलींची मूर्ती उभारण्याची परवानगी दिल्याची आख्यायिका आहे.

गुल्लिकायजी -
पहिल्याच महामस्तकाभिषेकावेळी दूध पायापर्यंत येईनासे झाले. नंतर गुल्लिकायजीच्या छोट्या कलशातून अभिषेक झाल्यानंतर भगवानावर पूर्ण अभिषेक झाला, अशी कथा आहे.

त्यागद ब्रह्मदेव स्तंभ -
हे या मूर्तीचे प्रमुख शिल्पी (तक्षक) होते. त्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com