‘ब्लू व्हेल’ बेळगावातही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

बेळगाव - जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात बेळगावचेही विद्यार्थी अडकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. शनिवारी (ता. १६) शहरातील एका शाळेतील सुमारे २५ विद्यार्थिनी ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात अडकल्याचा संशय शाळा व्यवस्थापनाला आला. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थिनींना तातडीने प्राचार्यांकडे नेले.

बेळगाव - जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात बेळगावचेही विद्यार्थी अडकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. शनिवारी (ता. १६) शहरातील एका शाळेतील सुमारे २५ विद्यार्थिनी ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात अडकल्याचा संशय शाळा व्यवस्थापनाला आला. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थिनींना तातडीने प्राचार्यांकडे नेले. प्राचार्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून या प्रकाराची माहिती देऊन समज दिली.

पाल्यांवर लक्ष ठेवण्याची व त्यांना धोकादायक गेमपासून परावृत्त करण्याची सूचनाही प्राचार्यांनी दिली. शाळेमध्ये आणि परिसरात दिवसभर या प्रकाराची चर्चा होती. बेळगावातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार समजल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींचे पालक अक्षरशः हादरून गेल्याची माहिती मिळाली आहे. अन्य विद्यार्थ्यांचे पालकही या प्रकारामुळे धास्तावले आहेत. ‘ब्लू व्हेल’ गेममध्ये विद्यार्थी आपल्या हातावर विशिष्ट खूण तयार करतात. या शाळेतील २५ विद्यार्थिनींच्या हातावर अशी खूण आढळून आली आहे. या विद्यार्थिनी आठवी ते दहावीच्या वर्गातील आहेत. त्या विद्यार्थिनींच्या हातावरील खुणा पाहून शिक्षकही चक्रावले व त्यांनी तडक हे प्रकरण प्राचार्यांकडे नेले. 

‘ब्लू व्हेल चॅलेंज’ गेम सध्या जगभरात चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. या गेममध्ये विविध टप्पे असतात, ते टप्पे पूर्ण झाल्यानंतर गेम खेळणारी व्यक्ती आत्महत्या करते. अँड्रॉईडवरून एकदा डाऊनलोड केला, की तो डिलीट करता येत नाही. 
हा गेम खेळणाऱ्या भारतातील काही तरुणांनी व विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली; पण बेळगावमध्ये यासंदर्भातील एकही प्रकरण बाहेर आले नव्हते. शनिवारी एकाच शाळेतील २५ विद्यार्थिनी ब्लू व्हेल गेम खेळत असल्याचा संशय शिक्षकांना व प्राचार्यांना आल्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

आत्महत्या ही शेवटची स्टेप
हा गेम खेळणाऱ्यांना `मास्टर`कडून `टास्क` दिले जातात. त्यामध्ये हातावर विविध खुणा काढणे किंवा रक्तानं `ब्लू व्हेल` कोरणे, `हॉरर` सिनेमा पाहणे यांचा समावेश असतो. गेममध्ये एकूण ५० `लेव्हल्स` आहेत. ५० वी `लेव्हल` ‘आत्महत्या करणे’ अशी आहे. 

मंडोळी हायस्कूलमध्ये जागृती
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मंडोळी (ता. बेळगाव) हायस्कूलमध्ये ‘ब्लू व्हेल’ या जिवघेण्या गेमविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. मुख्याध्यापक के. व्ही. जठार यांच्यासह अनेकांनी मोबाईलचा अनावश्‍यक वापर टाळण्याचे आवाहन केले. 
ब्लू व्हेलमध्ये शेवटचा टप्पा आत्महत्या असून, त्यापासून दूर राहावे. मोबाईलचा दुरुपयोग टाळण्याचे सांगून शाळा परिसरात मोबाईलवर निर्बंध असल्याचे सांगितले.