राम मंदिराबाबत भाजपची सबुरीची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

अयोध्या राम मंदिर भव्य उभारणी हा विषय आजही जाहीरनाम्यात आहे. आम्ही या मुद्द्यापासून दूर गेलेलो नाही. चर्चा, कायदा करणे आणि न्यायालयाचा निर्णय या तीन पर्यायांमधून प्रश्न सुटू शकतो. परंतु संबंधितांशी चर्चा करण्यात आली, ती यशस्वी होऊ शकली नाही. सध्या कायदा करून मंदिर उभारण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही. न्यायालयाने ही सरकारवर जबाबदारी टाकली असलीतरी न्यायसंस्थेचे म्हणणे पाहावे लागेल

मुंबई : भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत, अशी माहिती देतानाच अयोध्येतील राम मंदिर उभारणीबाबत सबुरीची भूमिका असल्याचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने खा. सहस्रबुद्धे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "अयोध्या राम मंदिर भव्य उभारणी हा विषय आजही जाहीरनाम्यात आहे. आम्ही या मुद्द्यापासून दूर गेलेलो नाही. चर्चा, कायदा करणे आणि न्यायालयाचा निर्णय या तीन पर्यायांमधून प्रश्न सुटू शकतो. परंतु संबंधितांशी चर्चा करण्यात आली, ती यशस्वी होऊ शकली नाही. सध्या कायदा करून मंदिर उभारण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही. न्यायालयाने ही सरकारवर जबाबदारी टाकली असलीतरी न्यायसंस्थेचे म्हणणे पाहावे लागेल. तेव्हा राम मंदिरप्रश्नी भाजप सावध भूमिका असल्याचे,'' सहस्रबुद्धे यांच्या बोलण्यातून दिसून आले. 

रोजगार निर्मिती, भ्रष्टाचाराला आळा घालणे, राज्यांना अधिक अधिकार, गरिबांचे सबलीकरण, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींचे कल्याण, शेतीचा विकास, महिलांचे सशक्तीकरण, दिव्यांगांचे अधिकार, लहान मुलांचे आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढविणे अशा अनेक बाबतीत भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. काही बाबतीत आश्वासनांच्या पलीकडे जाऊन कामे केली आहेत, असा दावा सहस्रबुद्धे यांनी केला. 

देशामध्ये रोजगारनिर्मितीसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे अनौपचारिक क्षेत्रात रोजगार वाढले आहेत. मुद्रा योजनेत सात कोटी लोकांना कर्ज दिल्यामुळे त्यांच्या रोजगारनिर्मितीला मदत झाली आहेच पण त्यासोबत त्यांचे व्यवसाय वाढल्यामुळे त्यामार्फत इतर अनेकांना रोजगार मिळाल्याचा दावा सहस्रबुद्धे यांनी केला.