चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

1962 नंतर दोन्ही सैन्यांमध्ये सर्वांत अधिक काळ सुरू असलेला हा तणाव आहे. 2013 मध्ये लडाख भागात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती, त्या वेळी 21 दिवस दोन्ही सैन्य एकमेकांसमोर होते. नंतर मात्र चिनी सैनिकांना सीमेपलीकडे ढकलण्यात आले होते.

नवी दिल्ली - सिक्कीममधील वादग्रस्त भागामधील आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने "विनायुद्ध स्थितीतील' काही सैन्य तुकड्या येथील डोका खिंडीमध्ये तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1962 पासून येथील डोकलाम भागावरील ताब्याबाबतचा वाद गेल्या महिन्यापासून पुन्हा सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने ही भूमिका घेतली आहे. 

"विनायुद्ध स्थितीतील सैन्य' म्हणजे जवान आपल्या बंदुकांची टोके जमिनीकडे करतात. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी भारताची दोन खंदके नष्ट केल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली असून, अधिक सैन्य तुकड्या या भागात तैनात केल्या आहेत. याबाबत प्रथमच लष्करातील सूत्रांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, एक जूनला "पीएलए'ने भारतीय लष्कराला या भागातील दोन खंदके काढून टाकण्यास सांगितले. गेल्या काही वर्षांपासून या भागात टेहळणी करत असलेल्या भारतीय लष्कराने ही खंदके 2012 मध्ये तयार करण्यात आली होती. भूतान-चीन सीमेवरील सुरक्षा वाढविण्याचाही यामागे हेतू होता. चीनने खंदके काढून टाकण्याची सूचना केल्यावर याबाबत पश्‍चिम बंगालमधील सुकना येथील मुख्यालयात माहिती देण्यात आली. या दरम्यान सहा जूनला चीनने या भागावर आपला दावा सांगत बुलडोझरच्या मदतीने ही खंदके नष्ट केली. यानंतर भारतीय सैन्याने तातडीने त्यांना प्रतिबंध करत पुढील हालचाल रोखली. चीनने येथे अतिरिक्त कुमक मागविताच आपली बाजू बळकट करण्यासाठी भारतालाही अतिरिक्त सैन्य तैनात करावे लागले आहे. 

1962 नंतर दोन्ही सैन्यांमध्ये सर्वांत अधिक काळ सुरू असलेला हा तणाव आहे. 2013 मध्ये लडाख भागात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती, त्या वेळी 21 दिवस दोन्ही सैन्य एकमेकांसमोर होते. नंतर मात्र चिनी सैनिकांना सीमेपलीकडे ढकलण्यात आले होते.

नकाशा प्रसिद्ध करत चीनचा डोकलामवर दावा 
बीजिंग - सिक्कीममधील डोकलाम भागात भारतीय जवानांनी घुसखोरी केली होती, या आपला दावा सिद्ध करण्यासाठी चीनने आज एक नकाशा प्रसिद्ध केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या नकाशामध्ये डोकलाम हा चीनचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच, या भागामध्ये चिनी सैनिक रस्ता बांधत असताना भारतीय सैनिकांनी त्यांना अडथळा आणला, असे खुणांच्या साह्याने दाखविण्यात आले आहे. 

डोकलाम या भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा येऊन मिळतात. चिनी सैनिकांनी येथे रस्ता तयार करण्यास भूताननेही आक्षेप घेतला आहे. हा भाग आपला असून 1988 आणि 1998 मध्ये झालेल्या करारानुसार, चीनची कृती बेकायदा ठरत असल्याचा भूतानचा दावा आहे. चीनने मात्र भारत आणि भूतानचे दावे फेटाळून लावत अरेरावी कायम ठेवली आहे. भारतीय सैन्य "चिनी भागात' घुसत असल्याची छायाचित्रेही त्यांनी आज प्रसिद्ध केली आहेत. भारतीय सैन्य बुलडोझरच्या साह्याने चिनी सैनिकांचे रस्त्याचे काम रोखत असल्याचे चीनने छायाचित्रांद्वारे म्हटले आहे.