इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

या उपग्रहांसमवेतच कार्टोसॅट 2 ई हा उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आला आहे. कार्टोसॅट 2 ई हा "पृथ्वी निरीक्षणा'साठी अवकाशात सोडण्यात आला आहे. 712 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कार्टोसॅट 2 या उपग्रहांच्या मालिकेमधील सहावा उपग्रह आहे

श्रीहरीकोटा - एकापेक्षा अधिक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासंदर्भातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज (शुक्रवार) "पीएसएलव्ही सी 38' च्या सहाय्याने तब्बल 31 उपग्रह अवकाशात सोडले. श्रीहरीकोटा येथील "सतीश धवन अवकाश केंद्रा'वरुन आज सकाळी हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीचे हे तब्बल 40 वे उड्डाण आहे!

प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपैकी कार्टोसॅट 2 हा उपग्रह सर्वांत महत्त्वाचा आहे. इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी या यशाबद्दल इस्रोमधील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

हे प्रक्षेपण सामान्य नसल्याची भावना "विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे संचालक के सिवान यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्‍त केली. सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यात आल्यानंतर पी एस 4 या वाहनास तब्बल 10 वेळा अवकाश कक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे सिवान यांनी सांगितले. प्रक्षेपित करण्यात आलेल्या 31 उपग्रहांबरोबरच इतर दोन "पेलोड' ही अवकाशात सोडण्यात आले आहेत. अवकाशात काही "प्रयोग' करण्यासाठी हे पेलोड सोडण्यात आल्याचे या प्रकल्पाचे संचालक बी जयकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

या उपग्रहांमध्ये तब्बल 14 देशांच्या 29 "नॅनो उपग्रहां'चा समावेश आहे. या उपग्रहांसमवेतच कार्टोसॅट 2 ई हा उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आला आहे. कार्टोसॅट 2 ई हा "पृथ्वी निरीक्षणा'साठी अवकाशात सोडण्यात आला आहे. 712 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कार्टोसॅट 2 या उपग्रहांच्या मालिकेमधील सहावा उपग्रह आहे.

याशिवाय, तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यामधील नूरुल इस्लाम विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक उपग्रहही याचवेळी अवकाशात सोडण्यात आला आहे.

या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले -
ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिले, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका