बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर संतप्त जमावाने या प्रकरणातील आरोपीला जबर मारहाण केली. या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दुमका (झारखंड) : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर संतप्त जमावाने या प्रकरणातील आरोपीला जबर मारहाण केली. या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आठ वर्षाची मुलगी कुसुमदिहून आपल्या काकाच्या रामगडमधील घरी लग्नसमारंभासाठी आली होती. दरम्यान गुरुवारी तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. मिथुन हंसदा (वय 30) याने नदीकिनारी खेळत असताना तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्याही केली. हे क्रौर्य करताना आरोपी तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. बेपत्ता मुलीचा शोध घेतल्यानंतर पालकांना जंगलामध्ये तिचा मृतदेह सापडला. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने मिथुनला मारहाण केली. त्यामध्ये मिथुनचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मिथुनचा मृतदेह आढळून आला. "आम्ही मृतदेह ताब्यात घेतला आहे. परंतु अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची अद्याप खात्री पटलेली नाही,' असे पोलिस उपअधिक्षक रोशन गुडिया यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे देण्यात आले आहेत. तसेच पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून पुढील तपास सुरु आहे.