नोटाबंदी, 'जीएसटी'मुळे अर्थव्यवस्था रसातळाला : राहुल गांधी

नोटाबंदी, 'जीएसटी'मुळे अर्थव्यवस्था रसातळाला : राहुल गांधी

जंबुसार (गुजरात) : केंद्र सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे व्यापाऱ्यांना सुलभपणे उद्योग करणे कठीण होऊन बसले असून, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. भरूचमधून आज पुन्हा प्रचाराला सुरवात करताना राहुल यांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. 

''आमचे अर्थमंत्री कार्यालयामध्ये बसतात आणि परकी संस्था काय म्हणतात याकडेच त्यांचे लक्ष असते. जेटली यांनी वास्तव जाणून घेण्यासाठी लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांची केवळ पाच ते दहा मिनिटे भेट घ्यावी आणि त्यांना खरोखरच केंद्राच्या निर्णयामुळे तुम्हाला व्यवसाय करणे सोपे झाले आहे का, असे विचारावे. अशावेळी सगळा देश एक सुरामध्ये 'जीएसटी' आणि नोटाबंदीमुळे आमचे नुकसानच झाले, असा सूर आळवेल,'' असे गांधी यांनी नमूद केले. 

तत्पूर्वी आज राहुल यांनी ट्विटच्या माध्यमातूनही जेटली यांच्यावर टीका केली होती. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते, की ''सब को मालूम है 'उद्योगस्नेहता' की हकीकत, लेकिन खुद को खुश रखने के लिए 'डॉ. जेटली' ये खयाल अच्छा है।'' राहुल यांच्या या टीकेला जेटली यांनीही प्रत्युत्तर दिले होते, 'यूपीए' आणि 'एनडीए'मध्ये हाच एकमेव फरक आहे, येथे 'ईज डुईंग करप्शन'ची जागा 'ईज डुईंग बिझिनेसने' घेतली आहे असे उत्तर देणारे ट्विट त्यांनी केले होते. 

आदिवासी भाग पिंजून काढणार 
आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये राहुल गांधी हे गुजरातमधील आदिवासी भाग पिंजून काढणार आहेत. राहुल यांच्या 'नवसर्जन यात्रे'ला आज भरूचमधून प्रारंभ झाला. ही यात्रा जवळपास 34 मतदारसंघांमधून जाईल. यातील बहुतांश मतदारसंघ हे कधीकाळी कॉंग्रेसचे बालेकिल्ले होते. भरूच, तापी आणि सुरत या तीन जिल्ह्यांना नजरेसमोर ठेवून ही यात्रा सुरू करण्यात आली होती. याखेपेस आम्ही पूर्वीच्या बारा जागांवर नक्की विजय मिळवू असा आशावाद कॉंग्रेस नेते डॉ. तुषार चौधरी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी आपल्या या दौऱ्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. 

मोदीही गुजरातमध्ये 
अक्षरधाम मंदिराच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या (ता. 2) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. स्वामी नारायण पंथाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही ते भाषण करतील. राज्य सरकारच्यावतीने 'प्रकाश महोत्सव' आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचेही मोदींच्या हस्ते उद्‌घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी हे भाजपचे स्टार कॅंपेनर असून, त्यांच्या विक्रमी सभांचे प्रदेश भाजपने आयोजन केले आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भाजपची प्रचार यात्रा जोर पकडण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com