भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

आता मुहूर्त शुक्रवारनंतरचा शक्‍य

आता मुहूर्त शुक्रवारनंतरचा शक्‍य

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची पहिली तारीख लांबण्यामागे सत्तारूढ भाजप नेतृत्वाचेही "एनडीए'बाबतचे विस्तारवादी धोरण मुख्यतः कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. संयुक्त जनता दलाचा (जेडीयू) भाजप आघाडीत अधिकृतरीत्या समावेश, तमिळनाडूतील दोन गटांच्या विलीनीकरणचा लांबलेला निर्णय आणि इतर काही प्रभावशाली पक्षांशी भाजपची पडद्याआड चाललेली चर्चा यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला मुहूर्त टळला आहे. आता या शुक्रवारनंतर (ता. 25) किंवा पुढच्या महिन्याच्या अगदी सुरवातीला हा विस्तार होण्याची चिन्हे आहेत.
काही चमत्कार न झाल्यास 2019 मध्ये मध्य व उत्तर भारतात 2014 च्या यशाची पुनरावृत्ती होणे अतिशय कठीण व महाराष्ट्र, राजस्थानात तर ती अशक्‍यच असल्याचे गंभीर फीड बॅक भाजप नेतृत्वाकडे आले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीचा भर दाक्षिणात्य राज्यांवर आहे. तमिळनाडूतील दोनपैकी एक पक्ष भाजपबरोबर आला तर त्याचा लाभच होईल, असा त्यांचा होरा आहे.

शेतकरी आत्महत्या, रोजगार घट, कर्जमाफी यावरून चौफेर घेरल्या जाणाऱ्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वाढते कुतूहल आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा हा अखेरचा मोठा विस्तार असेल. मात्र, अण्णा द्रमुक केंद्रातील सत्तेत येणार का आणि नितीशकुमार यांना हवे ते खाते मोदी देणार का, हे कळीचे मुद्दे आहेत. पाच सप्टेंबरला पितृपंधरवडा लागतो व नंतर सणासुदीचा हंगाम सुरू होतो. शेतीचाही नवा हंगाम लगेचच सुरू होतो. त्यामुळे शेतीसंकट व कर्जमाफीवरून दिवसेंदिवस अडचणीत येत चाललेल्या केंद्र सरकारसाठी वरील दोनपैकी एक मुहूर्त करणे अत्यावश्‍यक आहे. नितीशकुमार यांनी मोदींबरोबर जाण्याचा निर्णय केला तरी त्यांना किमान एक कॅबिनेट व एक राज्य मंत्रिपद हवे असल्याचे सांगितले जाते.
अमित शहा यांनी तमिळनाडू दौरा अचानक स्थगित केल्याने मंत्रिमंडळ विस्तार आगामी काही दिवसांत होण्याची शक्‍यता बळावली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंदही लेहचा दौरा आटोपून आजच दिल्लीत परतले आहेत. राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनुसार केंद्राकडून राष्ट्रपती भवनाला अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सूचना मिळालेली नाही. मात्र कोविंद यांचा आठवडाभर किंबहुना पुढचे दहा दिवस दिल्लीतच सातत्याने मुक्काम राहणार आहे याला सूत्रांनी दुजोरा दिला.

शिवसेनेला दोन मंत्रिपदे हवीत
शिवसेनेला केंद्रात दोन राज्यमंत्रिपदे हवी असल्याचे भाजपने म्हटले आहे. मागच्या वेळी अनिल देसाई शपथविधीच्या दिवशी दिल्लीत येऊनही राष्ट्रपती भवनावर पोचले नव्हते. यावेळीही मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू होताच शिवसेनेने ही मागणी रेटली आहे. प्रत्यक्षात ती मान्य होण्याची चिन्हे नसल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे. तमिळनाडूचे प्रभारी मुरलीधर राव यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहा यांच्याशी खलबते केली होती. शहा यांचे स्वागत करण्यासाठी ते चेन्नईतही पोहोचले होते. मात्र त्यांना दौरा रद्द जाल्याचा निरोप देण्यात आला व "तिथेच थांबा' असेही सांगण्यात आल्याचे कळते. थोडक्‍यात, अण्णा द्रमुकचा निर्णय पक्का झाला व मंत्री ठरले की त्यांच्या दोन गटांतील प्रस्तावित विलीनीकरणाचीही वाट पाहू नये अशा निर्णयाप्रत भाजप नेतृत्व आल्याचे समजते.