राणे-दाऊद संबंधांबाबत खुलासा करा: अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

राजनाथसिंह यांना काँग्रेसचे आव्हान

नवी दिल्ली: काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे बंडखोर नेते नारायण राणे यांना त्यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपावरून घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दाऊदशी राणेंच्या संबंधांवरून भाजप नेत्याने केलेल्या आरोपांबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा व गृहमंत्री राजनाथसिंह यांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच राजकीय पुनर्वसनासाठी राणेंच्या शोधमोहिमेला शुभेच्छाही दिल्या.

राजनाथसिंह यांना काँग्रेसचे आव्हान

नवी दिल्ली: काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे बंडखोर नेते नारायण राणे यांना त्यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपावरून घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दाऊदशी राणेंच्या संबंधांवरून भाजप नेत्याने केलेल्या आरोपांबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा व गृहमंत्री राजनाथसिंह यांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच राजकीय पुनर्वसनासाठी राणेंच्या शोधमोहिमेला शुभेच्छाही दिल्या.

राणेंवर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या आरोपांवरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, की भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेल्या वरिष्ठ नेत्याने नारायण राणेंबद्दल त्यांच्या दाऊद इब्राहिमशी संबंधांवरून सार्वजनिक आरोप केले आहेत. काल आरोप केला जातो आणि आज राजीनामा दिला जातो ही आश्‍चर्याची बाब आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य एक दिवस आधी राणेंच्या संबंधांबद्दल आरोप करतात, वृत्तवाहिन्या त्यावर चर्चासत्र घडवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा राजीनामा येतो. हे नेमके काय चालले आहे, यावर अमित शहा आणि राजनाथसिंह यांनी प्रकाश टाकावा. कोणत्याही राजकीय नेत्याचे दाऊदशी संबंध असल्यास त्याला शिक्षा व्हावी. राणेंबद्दल जे पुरावे भाजपकडे आहेत ते जाहीर केले जावेत, असे आव्हानही सुरजेवाला यांनी दिले.

महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी राणे यांना "राजकीय पुनर्वसनासाठी चालविलेल्या शोधमोहिमे'बद्दल शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्रिपदाचे आश्‍वासन न पाळून काँग्रेसने विश्‍वासघात केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता आणि प्रभारी मोहन प्रकाश यांनाही लक्ष्य केले होते. त्यावर बोलताना मोहन प्रकाश यांनी, "राणे काँग्रेसमध्ये आले तेव्हा मी काँग्रेसचा सचिवही नव्हतो आणि पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर मी महाराष्ट्राचा प्रभारी झालो,' अशा शब्दांत राणेंची टीका उडवून लावली. दीड वर्षात दोन विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून पराभव झाल्यानंतरही राणेंना विधान परिषदेवर आणले. राणे व त्यांच्या पुत्रांचे राजकीय वर्तन संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असाही टोला मोहन प्रकाश यांनी लगावला.

शिवसेनेविरुद्ध राणेंचा वापर?
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणे काय करणार याबाबत काँग्रेसमधूनही वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. गुजरातमध्ये ज्याप्रमाणे शंकरसिंह वाघेला यांनी तिसरी आघाडी बनवून भाजपविरोधात एकवटू पाहणाऱ्या मतपेढीला सुरुंग लावण्याची रणनीती आखली आहे, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नारायण राणेंच्या रूपाने होऊ शकते, अशी शक्‍यता काँग्रेसला वाटते. त्यासाठी राणेंना थेट भाजपमध्ये प्रवेश देण्याची गरज नसेल आणि त्यांचा कोकणात शिवसेनेविरुद्ध वापर केला जाईल, असे निरीक्षण काँग्रेसच्या एका नेत्याने नोंदवले.

Web Title: new delhi news Explain about Rane-Dawood relationship: Amit Shah