दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा भारत सहन करणार नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे पाकिस्तान सैनिकांकडून केले जाणारे समर्थन कधीही सहन करणार नाही, असे आज भारताने पाकिस्तानला सुनावले. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (डायरेक्‍टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) यांच्यात सोमवारी हॉटलाइनवर चर्चा झाली. दुपारी दोन वाजता झालेल्या चर्चेत पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर आरोप करत शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचे रडगाणे गायले.

भारताशी हॉटलाइनवर चर्चा करण्याचा आग्रह पाकिस्तानने केला होता. त्यानंतर दुपारी उभय देशाच्या डीजीएमओची फोनवरून चर्चा झाली. या वेळी पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून, भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले. भारताचे डीजीएमओ लेप्टनंट जनरल ए. के. भट्ट म्हणाले, ""प्रत्यक्ष ताबारेषेवर भारताने केवळ प्रत्युत्तर दिले आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे भारताकडून नेहमीच पालन केले गेले आहे. भारताने कधीही सुरवात केलेली नाही. भारताकडून झालेला गोळीबार हा केवळ दहशतवाद्यांसाठी होता आणि त्यास पाकिस्तानच्या सैनिकांचे समर्थन होते. भारताचे लष्कर कधीही नागरी वस्तीवर हल्ला करत नाही. दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते आणि भारतीय चौक्‍यांवर गोळीबार करणार होते. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा होता. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांना दिला जाणारा छुपा पाठिंबा भारत कधीही सहन केला जाणार नाही. जर दहशतवाद्यांकडून घुसखोरी होताना पाकिस्तान सैनिकांकडून समर्थन दिले जात असेल, तर त्याचे नुकसान पाकिस्तानला सोसावे लागेल. भविष्यातही भारताकडून कारवाई होतच राहील, असेही ठणकावले.