एका व्यक्तीसाठी राफेल करारात बदल: राहुल गांधी

एका व्यक्तीसाठी राफेल करारात बदल: राहुल गांधी

नवी दिल्ली : भारतीय वायुदलासाठी राफेल विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्ससोबत झालेल्या करारावरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच, एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी संपूर्ण करारच बदलण्यात आला असून, माध्यमे यावर पंतप्रधानांना प्रश्‍न का विचारीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीने घेतलेल्या कोटीकोटींच्या उड्डाणांवर माध्यमे मोदींना प्रश्‍न का विचारत नाहीत, असा सवाल करत त्यांनी माध्यमांना धारेवर धरले.

राहुल म्हणाले, "तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना मी उत्तरे देतो; पण तुम्ही हेच प्रश्‍न मोदींना का विचारत नाही? एका उद्योगपतीला फायदा व्हावा म्हणून पंतप्रधानांनी संपूर्ण राफेल करारच बदलला आहे.'' अखिल भारतीय असंघटित कामगार कॉंग्रेसची बैठक आटोपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल यांनी चौफेर फटकेबाजी केली. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून देखील सरकारवर टीकास्त्रे सोडली. विमान निर्मितीचा शून्य अनुभव असणाऱ्या रिलायन्सवर सरकारने एवढा विश्‍वास का दाखविला, असा सवाल करत त्यांनी "मेक इन इंडिया'साठी अशा प्रकारचा "सेल्फ रिलायन्स' गरजेचा असल्याचा टोमणाही मारला.

सरकारी कंपनीच्या हिताकडे दुर्लक्ष
तत्पूर्वी कॉंग्रेसने केंद्र सरकार स्वार्थी भांडवलशाहीला प्रोत्साहन देऊन राष्ट्रहितासोबत तडजोड करत असून, यामुळे जनतेच्या तिजोरीवर मोठा भार येत असल्याचा आरोप केला होता. भाजपने हे आरोप फेटाळून लावले होते. "राफेल' करारामध्ये केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या "हिंदुस्थान एअरोनॉटिक्‍स लिमिटेड' या कंपनीच्या हिताला प्राधान्य दिले नाही. राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या "डसाल्ट एव्हिएशन' या कंपनीने विमानाचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यास नकार देत "रिलायन्स डिफेन्स'सोबत करार केल्याचा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.

रिलायन्सच्या धमकीकडे दुर्लक्ष
कॉंग्रेसच्या आरोपांना गांभीर्याने घेत अनिल अंबानी यांच्या मालकीच्या "रिलायन्स डिफेन्स लिमिटेड' या कंपनीने कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर खटला भरण्याचा इशारा दिला होता. पण, याकडे दुर्लक्ष करत राहुल यांनी आज ट्विटरवरून हल्ला सुरूच ठेवला. याआधी विद्यमान सरकारवर "सूटबूट की सरकार' असा आरोप केल्यानंतर राहुल यांनी पुन्हा मोदींची फिरकी घेतली. मोदींनी आता सूट काढून ठेवला असला, तरीसुद्धा लुटीबाबत काय, असा सवाल त्यांनी केला.

मोदी लोकप्रिय नेते : अमित शहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली असून, लोक अर्थव्यवस्थेबाबत समाधानी आहेत. ही भावना आता सर्वोच्च स्थानी पोचली असल्याचा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. अमेरिकेतील "प्यू रिसर्च सेंटर'ने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला त्यांनी दिला आहे. सध्या देशाच्या आर्थिक स्थितीबाबत दहापैकी आठ भारतीय समाधानी असून देशाची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही अर्थव्यवस्थेची सुदृढता कायम असल्याचे भारतीयांचे म्हणणे असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com