कोविंदः वकिली पेशातून राजकारणाकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 जून 2017

नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे उमेदवारी मिळालेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशाचे आहेत. कानपूर जिल्ह्यातील डेरापूर गावात त्यांचा जन्म (ता. 1 ऑक्‍टोबर 1945) झाला. सध्या ते बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 1994 ते 2006 अशी बारा वर्षे म्हणजेच सलग दोन वेळेस ते राज्यसभेचे सदस्य होते. उत्तर प्रदेशातूनच ते राज्यसभेवर निवडले गेले होते.

कोविंद हे राजकीयदृष्ट्या फारसे वजनदार नेते म्हणून ओळखले जात नाहीत. पेशाने ते वकील आहेत. केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांनी 1977 ते 1979 म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे स्थायी वकील म्हणून त्यांनी 1980 ते 1993 असे काम पाहिले. यानंतर दिल्लीत त्यांनी वकिली व्यवसाय चालू ठेवला. भाजपच्या दलित मोर्चाचे ते 1998-2002 या काळात अध्यक्ष होते. अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. आठ ऑगस्ट 2015 रोजी त्यांना बिहारचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले.

कोविंद यांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या क्षेत्रात आपल्या राजकीय कारकिर्दीत सातत्याने पुढाकार घेतला. शिक्षणप्रसाराच्या कार्यातही त्यांनी विशेष काम केले. विशेषतः ग्रामीण भागात शिक्षणप्रसार होण्याच्या दृष्टीने तेथे शिक्षणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. राज्यसभेचे सदस्य असताना त्यांनी त्यांच्या खासदार निधीतून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील ग्रामीण भागात शाळा उभारणीसाठी भरीव मदत केली होती. दिल्लीत वकिली करताना त्यांनी दलित व मागासवर्गीयांसाठी "फ्री लीगल एड सोसायटी'ची स्थापना करून मोफत कायदेशीर सल्ला देण्याची सोय केली होती.

खासदार असतानादेखील त्यांनी मागासवर्गीय कल्याणाचे कार्य संसदेच्या माध्यमातून चालू ठेवले. अनुसूचित जाती-जनजाती संसदीय समिती, गृह मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, सामाजिक न्याय व सबलीकरण, कायदा व न्याय या समित्यांवर त्यांनी काम केले. राज्यसभा निवास समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.