तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

शशिकला यांचे "अंदर-बाहर'

नवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आज प्रसिद्ध झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शशिकला यांना तुरुंगात व्हीव्हीआयपी सुविधा दिली जात असल्याचे फुटेजमध्ये दिसते. आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी हे फुटेज लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सादर केले आहे. या व्हिडिओत शशिकला तुरुंगात "अंदर-बाहर' करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांची साथीदार इलावर्सीदेखील दिसत आहेत.

तुरुंगाच्या माजी पोलिस महानिरीक्षक डी. रूपा यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आहे. डी. रूपा यांच्या मते, सीसीटीव्ही फुटेजशी संबंधित असलेला सर्व अहवाल जमा केला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये शशिकला साध्या कपड्यात दिसून येत आहेत. त्यांना तुरुंगात येताना कोणीही अडवत नसल्याचे दिसून येते. त्या तुरुंगातील मुख्य दरवाजातून येतात आणि पोलिससुद्धा बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहेत. तुरुंगात नेमण्यात आलेले पोलिससुद्धा फुटेजमध्ये दिसत आहेत. शशिकला येण्यापूर्वी एक पोलिस अधिकारी येतो आणि त्याला एका कर्मचाऱ्याने सॅल्यूट केलेलेसुद्धा फुटेजमध्ये दिसते. या फुटेजमुळे पोलिस प्रशासनासंदर्भात अनेक प्रश्‍नचिन्हे उभी राहिली असून, त्याचा खुलासा चौकशीनंतरच होईल, असे सांगितले जात आहे. या सीसीटीव्ही फुटेजपासून तुरुंग अधिकारी अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला आहे. तुरुंगाच्या माजी अधिकारी असणाऱ्या रूपा यांनी तुरुंगाचे पोलिस महासंचालक एस. एस. एन. राव आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शशिकलांकडून कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप डी. रूपा यांनी केला असून, त्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

शशिकला यांच्यासाठी खास स्वयंपाकघर
बंगळूरच्या सेंट्रल तुरुंगात असणाऱ्या शशिकला यांना विशेष वागणूक मिळत असल्याचे उघडकीस आले होते. वृत्तानुसार शशिकला यांच्यासाठी तुरुंगात वेगळे स्वयंपाकघर केले असून, आयपीएस अधिकारी रूपा यांनी आपल्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालात म्हटले, की शशिकला यांना विशेष सुविधा दिली जात आहे. तत्कालीन डीआयजी असणाऱ्या रूपा यांनी पोलिस महासंचालक एच. एस. एन. राव यांना या संदर्भात पत्र लिहिले होते.