दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा 

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

या हल्ल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना तत्काळ प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यानंतर पोलिस, निमलष्करी दल; तसेच लष्कराने या परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमध्ये श्रीनगरमधील पंथा चौकात सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) उपनिरीक्षक आणि एक जवान हुतात्मा झाले. साहिब शुक्‍ला असे हुतात्मा अधिकाऱ्याचे नाव आहे. लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

आज सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. "सीआरपीएफ'च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी "सीआरपीएफ'च्या 29 बटालियनच्या गस्तीपथकावर हल्ला केला. येथील बस स्थानकाजवळच असलेल्या पंथा चौकात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. जखमी जवानांना तत्काळ बदामीबाग येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच उपनिरीक्षक साहब शुक्‍ला आणि एका जवानाला हौतात्म्य आले. जखमी नागरिकावर उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना तत्काळ प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यानंतर पोलिस, निमलष्करी दल; तसेच लष्कराने या परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गदेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.