पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

पुलवामा जिल्ह्यातील बहमनू भागात लपलेल्या तीन दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या जवानांनी सोमवारी कारवाई सुरु केली होती. या कारवाईदरम्यान दोन दहशतवाद्यांना सोमवारी ठार मारण्यात आले होते.

जम्मू - जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गेल्या 23 तासांपासून सुरु असलेले ऑपरेशन संपुष्टात आले असून, तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज (मंगळवार) जवानांनी तिसऱ्या दहशतवाद्याला ठार मारले.

पुलवामा जिल्ह्यातील बहमनू भागात लपलेल्या तीन दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या जवानांनी सोमवारी कारवाई सुरु केली होती. या कारवाईदरम्यान दोन दहशतवाद्यांना सोमवारी ठार मारण्यात आले होते. या वेळी झालेल्या चकमकीत दोन जवानांसह सहा जण जखमी झाले होते. दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी येथे शोधमोहीम सुरू केली होती. या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले.

तिसऱ्या दहशतवाद्याला आज सकाळी कंठस्नान घालण्यात आले. लष्कराकडून कारवाई होत असताना स्थानिक नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली होती. तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.