मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

1 ऑक्‍टोबरला मोहर्रम असल्याने यादिवशी दुर्गाविसर्जन करता येणार नाही. 2,3 व 4 ऑक्‍टोबरला दुर्गा विसर्जन करता येईल

कोलकत्ता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहर्रमच्या दिवशी राज्यात दुर्गाविसर्जन करण्यास बंदी घातली आहे. दुर्गा पूजा हा सण पश्‍चिम बंगाल राज्याची एक अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक ओळख मानला जातो. ""या वर्षी दुर्गापूजा व मोहर्रम एकाच दिवशी आले आहेत. यामुळे मोहर्रमचा दिवस वगळता इतर दिवशी दुर्गाविसर्जन करता येईल,'' असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

या वर्षी येत्या 1 ऑक्‍टोबरला मोहर्रम आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मोहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जनास मुख्यमंत्रयांकडून मनाई करण्यात आली आहे.

"सणांच्या दिवशी शांतता असणे महत्त्वाचे आहे. मोहर्रम साजरा होत असलेल्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येईल. दोन समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑक्‍टोबरला मोहर्रम असल्याने यादिवशी दुर्गाविसर्जन करता येणार नाही. 2,3 व 4 ऑक्‍टोबरला दुर्गा विसर्जन करता येईल,'' असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

बॅनर्जी यांनी गेल्या वर्षीही (2016) अशाच स्वरुपाचे आदेश दिले होते. मात्र कोलकत्ता उच्च न्यायालयाने या आदेशास स्थगिती दिली होती. यावेळीही बॅनर्जी यांच्या या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.