अमेरिकेस खूश करण्यासाठीच भारताकडून "सीमोल्लंघन': चीन

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

इतक्‍या राजनैतिक प्रयत्नांनंतरही भारताला अमेरिकेची मर्जी जिंकता येणे शक्‍य नाही. भारत हा "राष्ट्रीय सामर्थ्या'च्या बाबतीत चीन व अमेरिका या देशांच्या खूपच मागे आहे

नवी दिल्ली - चीनच्या उदयास पायबंद घालण्यासंदर्भातील कटिबद्धता दर्शविण्यासाठीच भारताकडून भारत-चीन सीमारेषेचे उल्लंघन करण्यात आल्याची टीका "ग्लोबल टाईम्स' या चीनमधील सरकारी वृत्तपत्रामधून करण्यात आली आहे.

""भारत-चीन सीमारेषेवरील तणाव (फेस ऑफ) व भारताकडून घेण्यात आलेला "अँटी डम्पिंग'च्या चौकशीचा निर्णय या दोन्ही घटना मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवरच घडल्या आहेत. भारताकडून दाखविण्यात आलेल्या या धाडसाचा संबंध लोकांनी मोदी-ट्रम्प भेटीशी जोडला आहे,'' असे या लेखामध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांना प्रभावित करण्यासाठीच ही पाऊले उचलण्यात आल्याचा निष्कर्ष ग्लोबल टाईम्सकडून काढण्यात आला आहे.

"इतक्‍या राजनैतिक प्रयत्नांनंतरही भारताला अमेरिकेची मर्जी जिंकता येणे शक्‍य नाही. भारत हा "राष्ट्रीय सामर्थ्या'च्या बाबतीत चीन व अमेरिका या देशांच्या खूपच मागे आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी चर्चा केलेले मोदी हे तब्ब्ल पाचवे देशप्रमुख होते. याचबरोबर, किमान 20 देशप्रमुखांशी भेटी झाल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींची भेट घेतली आहे. शिवाय "डि-ग्लोबलायझेशन' व "अमेरिका फर्स्ट' हे ट्रम्प यांचे धोरण व मोदी यांच्याकडून मांडण्यात येत असलेले "मेक इन इंडिया' धोरण परस्पर विरोधी आहे,' असाही सूर या लेखामधून व्यक्‍त करण्यात आला आहे.

सिक्कीममधील वादग्रस्त भागामधील आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने "विनायुद्ध स्थितीतील' काही सैन्य तुकड्या येथील डोका खिंडीमध्ये तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1962 पासून येथील डोकलाम भागावरील ताब्याबाबतचा वाद गेल्या महिन्यापासून पुन्हा सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने ही भूमिका घेतली आहे.

भारत-चीन दरम्यान सीमेवरील "ट्राय-जंक्‍शन पॉइंट्‌स'(जेथे तीन देशांच्या हद्दी मिळतात) निश्‍चित करण्याच्या संदर्भात उभय देशांत 2012 मध्ये झालेला करार आधारभूत मानण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार असे तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करताना संबंधित तिसऱ्या देशाबरोबर सल्लामसलतीची तरतूद आहे. त्यामुळे असा एखादा तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न हा या कराराचा भंग असल्याचे स्पष्ट करून भारताने चीनचा पर्दाफाश केला आहे. तसेच या परिसरात "जैसे थे' स्थिती राखण्याचे आवाहन केले आहे.

सिक्कीम येथील सीमारेषेवर अशा स्वरुपाचा तणाव असताना चीनकडून व्यक्त करण्यात आलेली ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.