कुलभूषण यांच्या फाशीसाठी पाक न्यायालयामध्ये याचिका

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

मागील वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जाधव यांना अटक केली होती, त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे.

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना तातडीने फाशी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका तेथील सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे. पेशाने वकील असणाऱ्या मुझमील अली यांनी त्यांचे वकील फारूख नाईक यांच्या माध्यमातून ही याचिका न्यायालयात सादर केली आहे. ते "पाकिस्तान पीपल्स पार्टी'चे नेते आणि सिनेटचे माजी अध्यक्ष आहेत.

देशांतर्गत कायद्याच्या आधारे संघराज्य सरकारला जाधव यांच्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पाकिस्तानी जनतेला देशाविरोधात कट रचणाऱ्या व्यक्‍तीस शिक्षा देण्याचा अधिकार असल्याचेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

कायद्याच्या चौकटीमध्ये जाधव यांचा खटला चालविण्यात आल्याचे न्यायालयाने जाहीर करावे, तसेच भारताने मागणी केल्याप्रमाणे जाधव यांना कायदेशीररीत्या वकील देऊनच खटला चालविण्यात आल्याचेही जाहीर करावे, अशी विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. मागील वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जाधव यांना अटक केली होती, त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाकमधील लष्करी न्यायालयाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर हेच प्रकरण भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नेले, तेथे मात्र या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.