...तर शाहबाज घेणार शरीफ यांची जागा

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

जनतेने मला निवडून दिले आहे, त्यामुळे आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार नाही.
- नवाज शरीफ, पंतप्रधान

इस्लामाबाद: "पनामा पेपर्स'शी संबंधित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आपले पद गमावण्याची वेळ आली तर, त्यांच्याजागी त्यांचे बंधू व पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ किंवा त्यांच्या पत्नी कलासूम यांची वर्णी लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

याप्रकरणी संयुक्त चौकशी समितीचा अहवाल नवाज शरीफ यांच्याविरोधात गेला असून, शरीफ यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयाने शरीफ यांना दोषी ठरवले तर, त्यांना पंतप्रधानपदावर पाणी सोडावे लागेल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी त्यांचे धाकटे बंधू शाहबाज यांना संधी मिळण्याची शक्‍यता बळावली आहे.

शाहबाज हे "मुस्लिम लीग-नवाज'चे मोठे प्रस्थ आहेत. मात्र, ते सध्या संसदेचे सदस्य नसल्याने या पदाची धुरा तात्पुरती (45 दिवस) संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्याकडे सोपविली जाऊ शकते. दरम्यानच्या काळात शाहबाज किंवा कलासूम यांना लोकसभेची निवडणूक लढवून ती जिंकणे अपरिहार्य आहे. शरीफ यांनी या अनुषंगाने शुक्रवारी पक्षाची बैठक बोलावून निर्णय घेतल्याचे समजते. निकाल विरोधात गेला तरी, पक्ष शरीफ यांच्या पाठीशी ठाम राहणार असून, सर्व पर्याय आजमावून पाहिले जाणार आहेत.


शरीफ यांनी न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आपली प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे.
- खुर्शिद शाह, विरोधी पक्षनेते