अमेरिका पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करणार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

पाकिस्तान हा अमेरिकेचा 'मित्रदेश' असला; तरी पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांसंदर्भात अमेरिकेकडून अधिक कठोर भूमिका घेतली जाण्याचे संकेत निश्‍चितपणे देण्यात आले आहेत

वॉशिंग्टन - अफगाणिस्तानमध्ये हल्ले घडविणाऱ्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात अधिक कठोर भूमिका घेण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत.

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमीरेषेवर अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत (ड्रोन) वाढ, पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीवर टाच हे अमेरिकेसमोर असलेल्या काही पर्यायांपैकी असल्याचे मानले जात असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनासमोरील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिका लढत असलेल्या युद्धास आता 16 वर्षे पूर्ण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प प्रशासनाकडून सध्या या रखडलेल्या युद्धाचे अभ्यासपूर्ण अवलोकन करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अफ-पाक धोरणासंदर्भात वाच्यता न करण्याची भूमिका व्हाईट हाऊस व पेंटॅगॉनकडून घेण्यात आली आहे. मात्र पाकिस्तान हा अमेरिकेचा मित्रदेश असला; तरी पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांसंदर्भात अमेरिकेकडून अधिक कठोर भूमिका घेतली जाण्याचे संकेत निश्‍चितपणे देण्यात आले आहेत.

पाकिस्तानमधील या दहशतवाद्यांच्या तळांवर मिळणाऱ्या आश्रयामुळे तालिबानला अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली हल्ले करणे शक्‍य होत असल्याचे मत तज्ज्ञांनी अनेकदा व्यक्त केले आहे.

पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी असल्याचे वृत्त पाकिस्तानने अनेकदा फेटाळून लावले आहे. याचबरोबर, पाकिस्तानमधील सैन्यही सध्या दहशतवाद्यांबरोबर लढत आहे. या पार्श्‍वभूमीवर, एकाच वेळी दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका व पाकिस्तानला न दुखविण्याची खबरदारी, अशी दुहेरी कसरत ट्रम्प प्रशासनास करावी लागणार असल्याचे मानले जात आहे.