थेट चर्चेद्वारा तणाव कमी करा; भारत आणि चीनला पेंटॅगॉनचा सल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 23 जुलै 2017

वॉशिंग्टन : डोकलाममध्ये लष्करांच्या हालचालींवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनने कोणत्याही वादाशिवाय थेट चर्चा करण्याचे आवाहन पेंटॅगॉनने शनिवारी केले.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते गॅरी रोस यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की आम्ही भारत तसेच चीनला तणाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून थेट चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसावी. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही गेल्या आठवड्यात अशाच प्रकारचे निवेदन केले होते.

गेल्या काही वर्षांमध्ये सीमावादावरील तोडग्यासाठी जबरदस्तीचे डावपेचांची रणनीती अवलंबली जात असल्याचा आरोप चीनच्या जवळपास सर्व शेजारी देशांनी बीजिंगवर केला आहे. सिक्कीम सेक्‍टरमध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या भारत-चीन सीमा वादासंबंधीचे "जैसे थे'ची परिस्थिती बदलण्यासाठी चीन वेगवेगळे डावपेच आखत आहे. भारतानेही चीनविरुद्ध कठोर पवित्रा धारण केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल या महिन्याच्या अखेरीस ब्रिक्‍स बैठकीत सहभागी होण्यासाठी बीजिंगला जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान दोवाल या प्रकरणी चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे.

पेंटॉगॉनने या प्रकरणी कोणाचीही बाजू घेण्यास नकार दिला आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यान वाढणाऱ्या तणावावरून पेंटॉगॉन चिंतीत आहे का, अशी विचारणा केली असता, रोस म्हणाले, की आम्ही यासंदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी भारत तसेच चीनच्या सरकारांना एकमेकांशी चर्चा करण्यास सांगू. या प्रकरणी आम्ही कोणत्याही प्रकारचा अंदाज बांधणार नाही.

दोवाल यांची भेट महत्त्वाची : चिनी अधिकारी
बीजिंग : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचा बीजिंग दौरा डोकलामवरून भारत आणि चीन यांच्या दरम्यान निर्माण झालेला तणाव कमी होण्यास महत्त्वाचा ठरू शकतो, असे मत एका चिनी विश्‍लेषकाने नोंदविले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्‍स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी दोवाल 27 आणि 28 जुलैला चीनचा दौरा करणार आहेत. भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी एक संधी म्हणून दोवाल यांच्या दौऱ्याकडे पाहिले पाहिजे, असे मा जियाली यांनी नमूद केले.