विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!

धनश्री बागूल
शुक्रवार, 23 जून 2017

पुनर्विवाहाचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांनी वाढले

विधवांसाठी १९९६ पासून संपूर्ण राज्यात काम करत आहे. शासनाच्या विविध योजनांमधून विधवांच्या पुनर्वसनाचे प्रमाण वाढत आहे. तसेच आता महिलादेखील पुनर्विवाह व पुनर्वसन करण्यासाठी जागृत झाल्या आहेत. त्यामुळे आता विधवांच्या समस्या कमी होत आहेत.
- रेणुका भावसार, सामाजिक कार्यकर्त्या

जळगाव - काही वर्षांपूर्वी समाजात ‘सती’ जाण्याची परंपरा होती. मात्र, बदलत्या काळानुसार ही परंपरा बंद झाली. विधवा स्त्रियांना आपले जीवन जगण्याची संधी मिळाली. मात्र, आजकाल कमी वयातच अनेक स्त्रिया विधवा होताना दिसून येत आहे. आजच्या युगात एकटे आयुष्य काढणेदेखील कठीण झाले आहे. यासाठी विधवांचे पुनर्विवाह करून पुनर्वसन केले जात आहे. पाच- सहा वर्षांत पुनर्विवाह होण्याचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांनी वाढले असून, विविध संस्थांमार्फत विधवांच्या आयुष्यातदेखील नवीन आशेचा किरण येत आहे.

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है केहेना’ अशी परिस्थितीही आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळते आहे. खासकरून ग्रामीण भागात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, महिलांमध्ये बदलत्या काळानुसार जनजागृती करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून आता महिला स्वतःहून पुनर्विवाहास तयार होत आहेत. यामुळे अनेक नवीन कुटुंबे उभी राहत असून, मुलांनादेखील याचा उपयोग होत आहे.

स्वावलंबी बनविणाऱ्या संस्था
सध्या अपघात, आत्महत्या, आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे अनेकदा कमी वयातच महिला विधवा होतात. त्यातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. अशा परिस्थितीत बऱ्याचदा विधवा महिलांचा आत्मविश्‍वास खचून जातो. अशा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यात अनेक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत महिलांना रोजगारासाठी विविध साधने उपलब्ध करून दिली जातात व महिला स्वावलंबी बनू शकतात. यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचा सर्वाधिक समावेश आहे.

विधवांबद्दलची मानसिकता
आजही ग्रामीण भागात व काही समाजांत पुरुषांचा विधवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार कुटुंबासाठी विधवा महिलांना नोकरीसाठी बाहेर पडावे लागतेच. तसेच कमी वयातच विधवा झाल्या असल्यास अनेकदा सासरची मंडळी विधवेचा पुनर्विवाह करीत असतात. मात्र, ग्रामीण भागातील लोकांना हे मान्य नसते. ते या महिलांच्या चारित्र्यावर नेहमी बोलत असतात. त्यामुळे विधवा महिलांच्या बाबतीत ग्रामीण भागतील पुरुषांची मानसिकता बदलण्याची सर्वाधिक गरज आहे.

ऋणानुबंधातून जुळतात ‘रेशीमगाठी’
ज्याप्रमाणे उपवर- वधूंसाठी प्रत्येक समाजातर्फे वधू- वर परिचय मेळाव्याची पुस्तिका काढली जाते, त्याचप्रमाणे विधवा महिलांसाठीदेखील समाजातर्फे पुस्तिका काढण्यात येत आहे. शहरातील लोकांची मानसिक बदलली असून, आजकाल पती अथवा पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ते पुनर्विवाह करण्यास तयार असतात. त्यामुळे ऋणानुबंध पुस्तिका व व्हॉट्‌सअॅप ग्रुपच्या माध्यमातूनदेखील विधवांच्या ‘रेशीमगाठी’ जुळताना दिसून येत आहे.