विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 3 जुलै 2017

वधू अनिता किंद्रे (रा. सासवड, मुळची रा. बालवडी, ता. भोर) ही वधू स्वतः एम.एस्सी. (वनस्पतीशास्त्र) असून वन्यजीव छायाचित्रकार व वनस्पतीतज्ज्ञ आहे. ती चार वर्षे विविध झुडपवर्गीय, इतर वृक्षांचा व विविध बुरशींचा अभ्यास करीत आहे.

सासवड - अलीकडे विवाह म्हणजे बहुधा उधळपट्टीच असते. मात्र विवाहातील खर्चात बचत करुन मंडपात येणाऱया साऱया मान्यवर व वऱहाडींना केशर व बदाम या वाणाची आंब्याची आणि खाण्याच्या लिंबाच्या झाडांची 2 हजार रोपे वाटपाचा वधू - वरांनी उपक्रम राबविला. अनिता संपतराव किंद्रे व श्रीनाथ सीताराम खंडाळे या निसर्गप्रेमींनी आपल्या विवाहात हे मोलाचे काम केले. तेवढेच नाही.. तर रुखवतातही झाडांची रोपेच अधिक होती. 

वधू अनिता किंद्रे (रा. सासवड, मुळची रा. बालवडी, ता. भोर) ही वधू स्वतः एम.एस्सी. (वनस्पतीशास्त्र) असून वन्यजीव छायाचित्रकार व वनस्पतीतज्ज्ञ आहे. ती चार वर्षे विविध झुडपवर्गीय, इतर वृक्षांचा व विविध बुरशींचा अभ्यास करीत आहे. तीन पश्चिम घाटातील विविध वनस्पतींचींवर वेबासाईटही निर्माण केली आहे. वडीलांनी पंचवीस वर्षापूर्वी गावाकडे 100 आंब्याची झाडे लावली होती. तिथपासून प्रेरणा घेत वनस्पती अभ्यास व वडीलांच्या छायाचित्रण व्यवसायातून छंद जोपासला.  तर वर श्रीनाथ सीताराम खंडाळे (रा. येवली, ता. भोर) हे एमए.बीएड्. असूनही बांधकाम तज्ज्ञ म्हणून काम करतात. मात्र त्यांना निसर्गासह ट्रेकींगची आवड असून ते सर्पमित्रही आहेत. आपापल्या निसर्गप्रेमाच्या आवडीनुसार दोघांनी घरच्यांच्या संमतीने जोडीदार पसंत केले. त्यातूनच त्यांनी आपल्या विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे 28 जून रोजी झालेल्या विवाह सोहळ्यात झाडांची तब्बल 2,000 रोपे वाटपाचा उपक्रम राबविला.

कोणी मान्यवर आला, मित्र परिवार, नातेवाईक किंवा वऱहाडी आला.. तरी साऱयांच्या शुभेच्छा स्विकारताना त्याला झाडाचे रोप दिले जात होते. तसेच ते लावण्याचा आग्रह वधू - वर करीत होते. कागद वाचविण्यासाठी त्यांनी विवाहाची पत्रिका न छापता सोशल मिडीयाव्दारेच निमंत्रणे पोचविली. विवाह मंडपात सुध्दा झाडे लावा, झाडे जगवा.. चा संदेश देणारे फलक व फ्लेक्स होते. वधू अनिता प्रतिक्रीयेत म्हणाली., पर्यावरणाबाबत आम्ही दोघेही आपल्या परिने काम करीत होतो. माझ्या सुखी संसाराची मी स्वप्ने पाहताना जगही सुखी पाहता यावे, म्हणून आम्हा दोघांपासून ही पर्यावरण जागृतीचे छोटे काम केले. लोकांनी विवाह, वाढदिवस व इतर कार्यक्रमात अशीच वृक्षाची रोपे वाटून उपक्रम पुढे न्यावा. अनिता हीला वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत दोन आंतरराष्ट्रीय पारितोषिके व नुकताच वसुंधरा पुरस्कारही मिळाला. संसारात व पर्यावरणाच्या कामातही आता दोनाचे चार हात झाल्याचे व बळ वाढल्याचे श्रीनाथ खंडाळे व अनिता किंद्रे यांनी सांगितले. अनिताची बहीण अॅड. अर्चना किंद्रे हीने तर पर्यावरणपुरक उपक्रमाचे तोंड भरुन कौतुकच केले.